मौजमज्जासाठी करायच्या त्या घरफोडी
सख्ख्या बहिणींचा घरफोडीचा खेळ
पंकज रोडेकर, ठाणे
ठाण्याच्या मध्यवर्ती नौपाडा परिसरात अजूनही जुनी वस्ती टिकून आहे, पण या शांत परिसरात अलीकडेच घडलेल्या घरफोड्यांच्या मालिकेने नागरिकांना हादरवून सोडले. पोलिसांना वाटले, नेहमीप्रमाणे ही साधी चोरी असेल, पण तपासात धक्कादायक वास्तव उघडकीस आले. या घरफोड्यांमध्ये दोन सख्ख्या बहिणी लॅच असलेले दरवाजे पाहून घरात शिरायच्या. कोणतीही रेकी, कोणतेही साधन नाही. फक्त हातच त्यांची शस्त्रं होती, पण त्यांच्या चोरीचा शेवट एका छोट्याशा तपशिलामुळे झाला. ती म्हणजे त्यांच्या पायांची सहा बोटं. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसलेल्या या खास खुणेमुळे पोलिसांनी अखेर त्यांना जेरबंद केले.
ठाणे शहराचा चेहरा म्हणून आज नौपाडा परिसर ओळखला जात आहे. जुन्या इमारतींचा हा परिसर तसा शांतमयच आहे. त्यामुळे चोरट्यांकडून या परिसराला नेहमीच टार्गेट केले जाते. नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७ ऑक्टोबर रोजी एका घरफोडीची घटना घडली होती. तक्रारदार निरजी कारिया (२७) हे त्यांच्या पत्नीसोबत काही कामानिमित बाहेर गेले होते. या वेळी चोरट्यांनी त्याच्या घरातून तब्बल पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज घेऊन पोबारा केला. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला. घरफोडी करणाऱ्या दोन महिला असल्याची माहिती पोलिसांना बातमीदारांकडून मिळाली, मात्र महिलांबाबत कोणताच तपशील हाती नसल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसासांठी आव्हान होते.
पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली आणि तब्बल १० दिवस डोळ्यात तेल घालून ठाणे शहरासह मुंबईतील तब्बल १०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये पोलिसांच्या हाती एक छोटासा पुरावा लागला. तो म्हणजे त्या महिलांच्या पायाला असलेली सहा बोटे. अशा महिला शोधणे ही तितकेच कठीण होते, परंतु पोलिसांनी हार न मानता पायाला सहा बोटे असलेल्या महिलांचा शोध घेतला आणि आरोपीपर्यंत पोहोचलेच. या नवेळी दोन्ही आरोपी महिला सख्ख्या बहिणीसोबत एकमेकांच्या सवतही असल्याची माहिती समोर आली. याबाबत अधिक तपास केला असता सवत असल्या तरी दोघी वेगवेगळ्या राहात असल्याचे समजले. त्यामुळे पुन्हा त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी दोन पथके तयार करून एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापा टाकत त्यांना ताब्यात घेतले.
मौजमजेसाठी चोऱ्या
लॅच असलेला दरवाजा सहज उघडून त्या दोघी घर साफ करायच्या. त्यांनी नौपाडा परिसरात तीन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्या गुन्ह्यांतील १०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. त्या दोघींनी मौजमजा करण्यासाठी घरफोडी करण्यास सुरुवात केली होती. मोठी बहीण सुजाता हिने २०१३ मध्ये पहिला गुन्हा केल्याचे तपासात समोर आले. मोठ्या बहिणीकडे पाहून छोटी बहीण सारिका हिनेही या विश्वात पाऊल टाकले. सारिकावर १० तर सुजाता हिच्यावर सात गुन्हे दाखल आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

