पाकिस्तान कैदेतील मच्छीमारांच्या कुटुंबीयांची कोरडी दिवाळी
पालघर, ता. २७ : आदिवासी समाजात शिमगा आणि दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. हे दोन सण हा समाज एकत्र कुटुंबसंस्कृतीतून उत्साहात साजरा करतात, मात्र पालघर जिल्ह्यातील १८ आदिवासी कुटुंबांनी यंदाची दिवाळी कुटुंबप्रमुख पुरुषाशिवाय आणि पैशाविना साजरी केली, कारण घरचे कमावते मच्छीमार खलाशी पुरुष पाकिस्तानाच्या मलिर तुरुंगात कैदेत आहेत. या कैदी मच्छीमार कुटुंबीयांची जबाबदारी सरकारने घेतली असली तरी त्यांना मिळणारा ५६ लाखांच्या जवळपासचा मदतनिधी न मिळाल्याने या मच्छीमारांच्या घरात फराळ तर सोडाच, पण त्यांची मुले, पत्नी, आईला घालायला नवीन कपडेसुद्धा नशिबात नव्हते. त्यामुळे या कुटुंबीयांची दिवाळी काळोखी आणि कमनशिबी बनली.
डहाणू तालुक्यात १८ मच्छीमारांचे कुटुंबीय राहात असून, गुजरातमध्ये हे खलाशी मच्छीमार तेथील मासेमारी बोटींवर कामासाठी गेले होते. मासेमारी करताना चुकून पाकिस्तान सागरी हद्द ओलांडल्याने त्यांना तेथील सुरक्षा यंत्रणांनी बंदी केले आहे. गेली दोन-तीन वर्षे ते पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडून आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या करारानुसार मच्छीमारांचे राष्ट्रीयत्व सिद्ध झाल्यानंतर त्यांना महिनाभरात सोडणे अपेक्षित आहे. पालघरमधील १८ मच्छीमारांची शिक्षा पूर्ण होऊन आणि त्यांचे राष्ट्रीयत्व सिद्ध झाल्यानंतरही त्यांना तुरुंगात राहावे लागत आहे. त्यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती दयनीय असून पत्नी, मुले आणि घरातील ज्येष्ठांची स्थिती दयनीय बनली आहे. घरातला कमावता पुरुष बाहेर असल्याने महिलावर्गाला पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवावा लागत आहे.
पाकिस्तानने त्यांना बंदी बनवल्यानंतर गुजरातमध्ये अशा मच्छीमार कुटुंबीयांना तीनशे रुपये प्रतिदिन नुकसानभरपाई मदतनिधी देण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता. याच धर्तीवर महाराष्ट्रानेही २०२३ मध्ये या कुटुंबीयांना मदत देण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान तुरुंगात तुरुंगवास भोगत असलेल्या कालावधीमध्ये बंदी असलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना तीनशे रुपये प्रतिदिन मदतनिधी दिला जाईल, असे राज्य सरकारने जाहीर केले. अनेक महतप्रयासानंतर मत्स्यव्यवसाय विभागाने मदतनिधीसाठी ६४ लाखांच्या जवळपासच्या निधीची मागणी केली.
पाकिस्तानात तुरुंगवास भोगत असलेले १८ मच्छीमार खलाशांना २७० दिवसांप्रमाणे ८१ लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. यापैकी केवळ १६ लाख २० हजारांचा तुटपुंजा निधी जूनच्या शेवटी राज्य सरकारने मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग केले. कोषागार कार्यालयामार्फत हा मदतनिधी १८ मच्छीमार खलाशी कुटुंबीयांच्या बँक खात्यात जमा केले, मात्र त्यानंतर पाच महिने उलटूनही उर्वरित ४७ लाख रुपयांच्या जवळपासचा निधी अजूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या कुटुंबीयांची दैनावस्था झाली असून. त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवल्याचे दिसून येत आहे.
सरकारने प्रयत्न करावेत!
गेली तीन-चार वर्ष पालघरमधील या मच्छीमार खलाशांच्या घरची अवस्था अतिशय वाईट आणि दिनवाणी आहे. घरचा कमावता व्यक्ती तुरुंगात असल्याने कुटुंबीयांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या मच्छीमारांना सोडवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी शांततावादी कार्यकर्ते जतीन देसाई यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

