पाण्याला सोन्याचा भाव

पाण्याला सोन्याचा भाव

Published on

अबब! पाण्यासाठी कोटीचा भुर्दंड

खारघरच्या रहिवाशांचा वर्षभरातील खर्च

खारघर, ता. २७ (बातमीदार) : येथील अनेक रहिवासी सोसायट्यांना सिडकाेतर्फे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. अनेक सोसायट्यांना खासगी टॅँकर विकत घ्यावे लागत असल्याने त्यांचा खर्च काेट्यवधींच्या घरात पाेहाेचला आहे. या परिसरातील एका साेसायटीला दीड वर्षात एक काेटीहून अधिक रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. एकीकडे नवी मुंबई महापालिका ५० रुपयांत एक हजार लिटर पाणी देत असताना शेजारीच असलेल्या खारघरवासीयांचा खिसा पाण्यासाठी रिकामा हाेत आहे.

खारघर शहरामध्ये अनेक भागांना पाणीटंचाईने ग्रासले असल्याने रहिवासी सोसायट्यांना खासगी टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. २८० सदनिका असलेल्या खारघर सेक्टर-३५मधील महावीर सोसायटीने गेल्या वर्षभरात ७० लाख रुपये, तर एप्रिल ते सप्टेंबर अशा सहा महिन्यांच्या कालावधीत टँकरसाठी जवळपास तीस लाख रुपये मोजले आहेत. या सोसायटीला दररोज दोन लाख ४० लिटर पाण्याची आवश्यकता आहे; मात्र सिडको एक लाख ४० हजार लिटर पाणी उपलब्ध करून देत असल्याने दररोज प्रति टॅंकरसाठी अडीच हजारांप्रमाणे वर्षाला लाखो रुपये मोजावे लागत आहेत. महत्त्वाचे म्हणजे सिडकोकडे याबाबत अनेकदा लेखी तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. तक्ररीनंतर काही कालावधीसाठी पुरेसा पाणीपुरवठा हाेताे. त्यानंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होत असल्याने सोसायटीच्या देखभालीचा पैसा पाण्यासाठी खर्च होत आहे. यासंदर्भात सिडको पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी बी. व्ही. गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क हाेऊ शकला नाही.
-----------------------------------------
खारघर वसाहत - सेक्टर-४०
आवश्यक पाणी - ७५ एमएलडी
सिडकोचा पुरवठा - ६५ ते ७० एमएलडी
पाण्याची वाटमारी - आठ ते दहा एमएलडी
------------------------------------
सोसायटी मासिक खर्च
किस्टोन विस्टा - एक लाख
चौरंग सिद्धी - एक लाख ३० हजार
ओव्हल सोसायटी - एक लाख ६० हजार
---------------------------------
राजकीय नेत्यांचे इशारे
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर आणि तळोजा येथील वसाहतींमध्ये उद्भवणाऱ्या पाणीप्रश्नावरून अनेकदा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. जोपर्यंत सिडकोतर्फे सद्य:स्थितीतील रहिवासी इमारतींना नियमित पाणीपुरवठा करता येत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना भोगवटा आणि बांधकामांना परवानगी देऊ नका, अशी सूचना ठाकूर यांनी केली आहे. पण त्यानंतरही खारघरसारख्या मोठ्या शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागत आहेत.
--------------------------------------
कूपनलिकांची भरमसाट देयके
खारघर सेक्टर ३४, ३५ परिसरातील बहुतांश सोसायट्यांनी आवारात कूपनलिकांचा आधार घेतला; मात्र त्यासाठी मोटर पंपाच्या जोडणीमुळे मासिक विद्युत देयकापोटी ७० ते ८० हजार रुपये मोजावे लागत असल्याचे भूमी त्रिवार सोसायटीचे पदाधिकारी अनसो देवकर यांनी सांगितले.
---------------------------------
कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांना टँकरसाठी लाखो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे सोसायटीच्या आवारातील जुन्या विहिरीला पुनर्जीवित करताना कपडे, अंघोळीसाठी त्या पाण्याचा उपयोग केला जातो. तरीही वर्षभरात सोसायटीचे सात लाख रुपये टँकरसाठी खर्च झाले आहेत.
- गुलाम सरफरे, गामी सोसायटी, रहिवासी, तळोजा
--------------------------------
सिडकोकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे प्रति कुटुंबास वार्षिक टँकरसाठी जवळपास २० हजार रुपये मोजावे लागत आहेत. सोसायटीने दीड वर्षात एक कोटीहून अधिक रुपये टँकरच्या पाण्यावर खर्च केला आहे. शिवाय अपुऱ्या पाण्यामुळे सोसायटीत वाद निर्माण होत आहे.
- सुनील धुमाळ, पदाधिकारी, महावीर हेरिटेज सोसायटी, खारघर
------------------------------------
खारघर, तळोजा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर गरज पूर्ण करावी लागते. सिडकोच्या दुर्लक्षाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
- विश्वनाथ चौधरी, काँग्रेस शहर अध्यक्ष, खारघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com