थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

Published on

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सामूहिक प्रतिज्ञा ग्रहण
वाशी, ता. २७ (बातमीदार) ः दक्षता आपली सामायिक जबाबदारी या संकल्पनेनुसार ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या समवेत विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे भष्टाचार निर्मूलनाची सामूहिक प्रतिज्ञा ग्रहण केली.
या वेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपआयुक्त किसनराव पलांडे, डॉ. कैलास गायकवाड व संघरत्ना खिल्लारे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त शुभेच्छा संदेश अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी वाचून दाखविला. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशाचे प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी वाचन केले. तसेच सामूहिक प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली. अशाप्रकारे महापालिकेच्या विभाग कार्यालयांसह इतरही कार्यालयांमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सामूहिक प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली. तसेच जनजागृतीसाठी सर्व ठिकाणी माहितीप्रत फलकही प्रदर्शित करण्यात आले आहेत.
.............
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास महापालिकेची उदासीनता
नेरूळ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर सहामधील रस्त्यावर खड्डे पडल्याने पादचाऱ्यांना व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांनी वारंवार लेखी तक्रारी करूनही खड्डे बुजविण्यास महापालिका प्रशासन उदासीनता दाखवित असल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. नेरूळ येथील वरुणा या सिडको सोसायटीच्या छोट्या प्रवेशद्वारालगतचा रस्ता काही प्रमाणात खचल्याचेही दिसून येत आहे. सारसोळे गावातील अंर्तगत रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. नेरूळ सेक्टर सहा परिसरातही अंर्तगत व बाह्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामधील अंर्तगत रस्त्याची डागडुजी व्हावी व खड्डे बुजविण्यात यावेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार सातत्याने महापालिका आयुक्त व नेरूळ विभाग कार्यालय यांच्याकडे लेखी तक्रारी करत आहेत. खड्डे बुजविण्यास व रस्त्याची डागडुजी करण्यास महापालिका प्रशासनाने उदासीनता दाखवित असल्याने रोष व्‍यक्‍त केला जात आहे.
.............
‘जीवीचे जिवलग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात
नवीन पनवेल (बातमीदार) : साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण निर्मिती असलेल्या कवी हेमंत गोविंद जोगळेकर यांच्या ‘जीवीचे जिवलग’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच कामोठे येथील सरोवर हॉल येथे साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत दिमाखात पार पडले. वाचनसंस्कृतीला बळकटी मिळावी आणि नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्याचे ध्येय ठेवलेल्या या कार्यक्रमाने साहित्यरसिकांना एक अनोखे व्यासपीठ मिळाले. देवाशिष प्रोडक्शनच्या निर्मात्या व अभिनेत्री सुजाता बत्तीन आणि हॅपी हार्ट्स ग्रुप, कामोठेचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या पुढाकारातून या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक व लेखक प्रेमानंद गज्वी, अभिनेते व लेखक इंद्रजित गोंड, आर. जे. गोपी, रवींद्र भोसले, मराठी पैसाचे संस्थापक महेश चव्हाण, लायन्स क्लबचे सेकंड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय गणात्रा, लेखक नामदेव घोडके,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अवंती अरुण जाधव हिने सादर केलेल्या लयबद्ध गणेश वंदनेच्या नृत्याने एक वेगळेच सांगीतिक वातावरण निर्माण केले. त्यानंतर सुजाता बत्तीन यांनी पुस्तकातील बा. भ. बोरकर यांचे व्यक्तिचित्र अभिवाचनाच्या प्रभावी शैलीत सादर करून रसिकांची प्रशंसा मिळवली. आपल्या मनोगतात बोलताना प्रेमानंद गज्वी यांनी वाचन संस्कृती जपणे ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे स्पष्ट करत साहित्य समाजाला दिशा दाखवते, असे मत व्यक्त केले.
............
तलावात पडून ३८ वर्षीय इसमाचा मृत्यू
नवीन पनवेल (बातमीदार) : तलावात पडून एका ३८ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मालडुंगे परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, याबाबत पनवेल तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत इसमाचे नाव दिनेश दत्ताराम पाटेकर (वय ३८) असे असून तो चेतूज फार्महाउस, मालडुंगे येथे केअरटेकर म्हणून कार्यरत होता. सोमवारी सायंकाळच्या सुमारास तो फार्महाउसमधून कामानिमित्त बाहेर पडला असताना, मालडुंगे गावाच्या रस्त्यालगत असलेल्या तलावाजवळ गेला. त्या वेळी पाय घसरल्याने किंवा तोल जाऊन तो सरळ तलावात पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तलावातील पाण्याची खोली जास्त असल्याने तो बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कुटुंबीय व स्थानिकांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. घटनास्थळी पोहोचलेल्या पनवेल तालुका पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला तसेच शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला असून, अशा ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना नसल्याबद्दल चिंतादेखील व्यक्त केली जात आहे.
...............
उड्डाणपुलालगतच्या स्क्रीन बोर्डाबाबत नागरिकांची नाराजी
पनवेल (बातमीदार) ः पनवेल मार्गावरील उड्डाणपुलालगत महापालिकेने लावलेला स्क्रीन बोर्ड नागरिकांमध्ये चिंतेचा विषय ठरत आहे. या ठिकाणी बसवलेला डिजिटल स्क्रीन बोर्डमुळे अपघाताची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. नवीन पनवेलकडून पनवेलकडे उतरताना उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूसच हा मोठा स्क्रीन बोर्ड लावण्यात आला आहे. सध्या या बोर्डवर जाहिराती दाखवण्यास सुरुवात झालेली नसली, तरीही तो वाहनचालकांचे लक्ष वेधून घेत आहे. येत्या काळात या स्क्रीनवर लख्ख प्रकाशात झगमगणाऱ्या जाहिराती दाखवल्या गेल्यास, वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता वाढेल, असा वाहनचालकांचा इशारा आहे. उड्डाणपूल आणि स्क्रीन बोर्ड यांमधील अंतर कमी असल्याने तसेच रस्ता उतारावर असल्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका अधिक आहे. महानगरात खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असताना, त्याकडे दुर्लक्ष करून महापालिका ठिकठिकाणी स्क्रीन बोर्ड उभारण्यावर भर देत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी अपघाताचा धोका टाळण्यासाठी हा स्क्रीन बोर्ड तातडीने काढून टाकावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
........

बेलापूर-रसायनी बस रद्द केल्याने गैरसोय
खारघर, ता. २७ (बातमीदार) : बेलापूर ते रसायनी मार्गावरील ‘एनएमएमटी’ची सकाळी सात वाजताची नियमित बससेवा गेल्या काही दिवसांपासून अचानक रद्द केली जात असल्याने रसायनी परिसरात कामगार, शिक्षक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. परिणामी प्रवासीवर्गातून संताप व्यक्त केला जात असून या त्वरित बससेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाकडून बस क्रमांक ४८ ही बेलापूर रेल्वेस्थानक–कामोठे–कळंबोली–तळोजा–रसायनी या महत्त्वाच्या औद्योगिक व शैक्षणिक मार्गावर धावते. रसायनी परिसरात अनेक मोठ्या कंपन्या आणि तंत्रनिकेतने असल्यामुळे खारघर, कामोठे आणि कळंबोलीसह आसपासच्या उपनगरांतून रोज शेकडो विद्यार्थी आणि कामगार या मार्गाने प्रवास करतात. सकाळी ७ची बस विशेषतः कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आणि फॅक्टरी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र ही बस सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता थांबवली जात असल्याने प्रवाशांना बेलापूर किंवा पनवेलपर्यंत जाऊन तेथून रिक्षा, टॅक्सी किंवा इतर मार्गाने रसायनीपर्यंत प्रवास करावा लागत आहे. यामुळे वेळ, अतिरिक्त भाडे आणि असुविधा वाढून प्रवाशांमध्ये सततची नाराजी पसरली आहे.
खारघरहून रसायनीत नोकरीसाठी जाणारे सदानंद सिरस्कर म्हणाले, सकाळी ७ची बस रद्द केल्याने विद्यार्थ्यांना व्याख्यानांसाठी उशीर होतो तसेच कामगारांना कंपनीत वेळेवर पोहोचणे कठीण जात आहे. बेलापूर बसस्थानक आणि तुर्भे आगारात चौकशी करताच ‘बस कमी आहेत, कर्मचारी कमतरता आहे आणि पनवेल–रसायनी मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे सेवा रद्द केली’, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com