शहरातील ऐतिहासिक विहिरी दुर्लक्षित

शहरातील ऐतिहासिक विहिरी दुर्लक्षित

Published on

शहरातील ऐतिहासिक विहिरींची दुरवस्था
कचरा व शेवाळाच्या विळख्यात; संवर्धन करण्याची मागणी
तुर्भे, ता. २७ (बातमीदार) : नवी मुंबई परिसरात आधुनिक पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध असली तरी अनेक ऐतिहासिक विहिरी आजही अस्तित्वात आहेत, मात्र वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर या विहिरींकडे प्रशासनाने संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीपुरवठ्याचा पर्यायी स्रोत ठरू शकणाऱ्या या विहिरी बंदिस्त, कचरा व शेवाळाच्या विळख्यात सापडून त्‍यांची दुरवस्था झाली आहे. त्‍यामुळे या जलस्रोतांचे तातडीने संवर्धन करण्याची मागणी केली जात आहे.
पूर्वी गावागावात पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार विहिरी होत्या. नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ त्यांचा वापर दैनंदिन गरजांसाठी केला जात राहिला, मात्र आज अनेक विहिरी पूर्णपणे वापराबाहेर गेल्या असून, त्या कचरापेटीत रूपांतरित झाल्या आहेत. काही ठिकाणी वर्षानुवर्षे साचलेल्या पाण्यावर शेवाळ साचून दूषित स्थिती निर्माण झाली आहे. अनेक विहिरींच्या परिसरात झुडपे, जंगली वाढ, प्लॅस्टिक, दारूच्या बाटल्यांचे अस्ताव्यस्त दृश्य दिसून येते. नवी मुंबई महापालिकेच्या जलपुरवठा विभागाकडून वेळेवर साफसफाई न झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्याशिवाय विहिरी स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही, असा आरोप स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे. ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक पाणी स्रोत या दोन्ही दृष्टीने विहिरी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेऊन शहरातील विहिरींची तत्काळ साफसफाई, दुरुस्ती आणि जलशुद्धीकरणाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे.
...............
नवी मुंबईतील बेलापूर ते दिघा या आठही विभागांत एकूण ९४ विहिरी आहेत. यापैकी मोठ्या प्रमाणावर विहिरी घणसोली, कोपरखैराणे आणि ऐरोली परिसरात असून, बहुतेक विहिरी सध्याच्या अवस्थेत वापरासाठी अयोग्य ठरल्या आहेत. शिवाय एमआयडीसी परिसरात औद्योगिक प्रकल्पांसाठी जागा तयार करताना अनेक विहिरी बुजविण्यात आल्याने त्या नामशेष झाल्या आहेत. शहराच्या सातत्याने वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रत्येक वर्षी कोरड्या हंगामात मोरबे धरण पातळी घसरू लागते आणि पालिकेला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागतो. अशा स्थितीत विहिरींचे संवर्धन व पुनर्वापर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
..........
नवी मुंबईतील विहिरींची संख्या

बेलापूर – ८

नेरूळ – १२

तुर्भे – १२

वाशी – ३

कोपरखैराणे – १३

घणसोली – २१

ऐरोली – १७

दिघा – ८

एकूण : ९४ विहिरी
...........
इतिहासात नोंदी
नवी मुंबईतील गावे ही १२ व्या शतकाच्या आधीपासून असून, तशा लिखित स्वरूपात नोंदी उपलब्ध आहेत. पाणी ही माणसाची मूलभूत गरज असल्याने माणूस अगदी सुरुवातीपासूनच जलाशयाच्या ठिकाणी वस्ती करून राहू लागला किंवा त्याने वस्तीच्या ठिकाणी विहिरी, तलाव या माध्यमातून आपली पाण्याची सोय केली. बेलापूरच्या किल्ल्यात एका झऱ्याच्या उगमावर एक विहीर असून, ही विहीर पेशवे सरकारचे तत्कालीन विश्वस्त पांडुरंग रामचंद्र देवधर यांनी प्रमोद नाम संवत्सरे, चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुरुवार शके १७३२ म्हणजेच १८१० रोजी बांधल्याचा शिलालेख उपलब्ध आहे. पूर्वी सारसोळे नाक्यावर इंग्रजांचे एक कस्टम कार्यालय होते. येथे इंग्रजांनी १९०३ रोजी एक विहीर बांधली होती. या विहिरीचीही लिखित स्वरूपात नोंद उपलब्ध आहे, असे इतिहास अभ्यासक अमृत पाटील नेरूळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com