बदलापूरमध्ये वाहतुकीचा खोळंबा

बदलापूरमध्ये वाहतुकीचा खोळंबा

Published on

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २७ : शहरातील वाढती लोकसंख्या, त्याच वेगाने वाढणारी वाहनांची संख्या आणि प्रशासनाकडून ठोस वाहतूक नियोजनाचा अभाव या तिघांच्या संगमामुळे शहरातील वाहतुकीचे अक्षरशः ‘तीन तेरा’ वाजले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल हा पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा एकमेव दुवा असल्याने या पुलावर दिवसभर वाहनांच्या रांगा असतात. पर्यायी भुयारी मार्गावरही दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

लोकसंख्या, वाहनसंख्येत असमतोल वाढ
२०११ नंतर जनगणना न झाल्याने बदलापूरची वास्तविक लोकसंख्या अद्याप नोंदीत नाही. परंतु, गेल्या १५ वर्षांत शहर ग्रामीण स्वरूपातून नागरीकरणाच्या झपाट्याने वाढले आहे. सुमारे पाच लाखांहून अधिक लोकसंख्या झाली आहे. या तुलनेत वाहनांची संख्याही कैकपटीने वाढली आहे. तरी प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आलेले नाही. परिणामी, दररोज सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना तासन् तास अडकून राहावे लागते. अत्यावश्यक सेवांमधील रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहनेही या कोंडीत अडकत असल्याने आपत्कालीन सेवांवर गंभीर परिणाम होत आहे.

बदलापूरकरांची ‘दैनंदिन परीक्षा’
बदलापूर पश्चिमेतील बाजारपेठ, पूर्वेकडील अरुंद रस्ते, त्यात रिक्षांच्या लांबच लांब रांगा आणि अनधिकृत फेरीवाल्यांमुळे सामान्य नागरिकांना शहरात फिरणेच कठीण झाले आहे.
पदपथ नसल्याने पायी चालणाऱ्यांना धोकादायक स्थितीतून रस्त्यावरूनच चालावे लागते. शहरातील वाहतूक कोंडी, अनियोजित पार्किंग, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि प्रशासनाचे सुस्त नियोजन या सर्व समस्यांमुळे बदलापूरकरांचा संयम सुटू लागला आहे. प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवल्या नाहीत, तर नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा दिला जाईल, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

अपूर्ण प्रकल्प अन् आश्वासने कागदावरच
वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी काही वर्षांपूर्वी प्रशासनाने दोन नवीन उड्डाणपूल, बेलवली-कात्रप कारमेल स्कूल आणि बॅरेज रोड-होप इंडिया कंपनीपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे प्रस्ताव मांडले होते. त्याचबरोबर सॅटिस प्रकल्प आणि पार्किंग व्यवस्थेच्या योजनाही जाहीर केल्या होत्या. परंतु या सर्व प्रकल्पांवर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. राजकीय आश्वासने वारंवार देण्यात आली; मात्र पाच वर्षांनंतरही सर्व योजना फक्त कागदावरच आहेत.


शहरात मी फिरतीचे काम करतो. पूर्वेकडून पश्चिमेकडे जायला कित्येक तासांचा वेळ खर्च करावा लागतो. त्यात महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचायचे असेल तर, अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा लागतो. हे रस्तेही वाहतूक कोंडीत अडकले आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
- सागर कलशेट्टी, सामान्य नागरिक

रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. बाजारपेठेत पायी जाताना रस्त्याच्या एका बाजूला रिक्षाच्या रांगा, दुसऱ्या बाजूला फेरीवाले आहेत. यातून वाट काढत जावे लागते. त्यात धावणाऱ्या मोठ्या गाड्या त्यामुळे बदलापूर शहरात पादचाऱ्याचे मोठे हाल होत आहेत. पदपथच शिल्लक नसल्याने नागरिकांनी चालायचे कुठून हाच प्रश्न पडला आहे.
- दीपाली जाधव, महिला नागरिक

बदलापूर : शहरात वाहतूक कोंडीने बदलापूरकर त्रस्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com