थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

पेणच्या नुकसानग्रस्त शेतीची शिवसेना ठाकरे गटाकडून पाहणी
पेण, ता. २७ (वार्ताहर) : मागच्या दोन-चार दिवसांपासून परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळमध्ये पेण तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून याबाबत आज शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वाशी खारेपाट भागातील शेतीची पाहणी करत सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
तालुक्यातील वाशी, वढाव, सरेभाग, भाल विठ्ठलवाडी यासह संपूर्ण तालुक्यात परतीच्या पावसामुळे हजारों हेक्टर भातशेती उदध्वस्त झाली असून यामुळे शेतकरी पुर्णता हवालदिल होऊन चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला सावरण्याची जबाबदारी शासनाची असल्याने पेण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांनी केली आहे. या पाहणी दरम्यान उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, माजी तालुकाप्रमुख आनंत पाटील, ग्रामपंचायत वाशी सदस्य सुनील पाटील, उपविभाग प्रमुख समीर पाटील, शाखाप्रमुख सदा म्हात्रे, शाखाप्रमुख काशिनाथ म्हात्रे, उपशाखाप्रमुख महेश पाटील, युवा सेना प्रमुख चेतन मोकल, विभाग प्रमुख नंदू मोकल, युवा सेना अक्षय थवई आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
.............
लोकनेते अशोकदादा साबळे यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम
माणगाव (वार्ताहर) ः माणगाव–रोहा परिसरातील सामान्य जनतेचा आधारवड, मृदू स्वभावाचे, सर्व धर्मीयांना समान नजरेने पाहणारे नेते म्हणजेच स्वर्गीय अशोक साबळे यांच्या नवव्या स्‍मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या साध्या जीवनातून उभे राहिलेले नेतृत्व हे आजच्या राजकारणात एक आदर्श आहे. या लोकनेत्याच्या कार्याला आणि स्मृतीला अभिवादन करण्यासाठी लोकनेते स्वर्गीय अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान आणि सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, ता. २९ ऑक्टोबर रोजी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा अशोकदादा साबळे विद्यालय, माणगाव येथे होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता लोकनेते अशोकदादा साबळे यांच्या प्रतिमेस अभिवादन आणि स्मृतिसभेने होणार आहे. यानंतर सायंकाळी ५ वाजता ह. भ. प. माऊली महाराज जाहूरकर यांचे जाहीर होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध गायिका श्वेता दांडेकर यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा माणगावच्या संगीतप्रेमींसाठी खास आकर्षण ठरेल. कार्यक्रमाची शान वाढवणारा मुख्य सोहळा म्हणजे रात्री ८ वाजता होणारा अशोकदादा साबळे माणगाव भूषण पुरस्कार वितरण समारंभ, जो खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
..........

वारकरी संप्रदायासाठी नवे आध्यात्मिक केंद्र उभे
रोहा, ता. २८ (बातमीदार) : कोकण दिंडी रोहा वारकरी संप्रदायाच्या वतीने आळंदी येथे बांधण्यात आलेल्या कै. द. ग. तटकरे वारकरी भवनाचा उद्‌घाटन सोहळा रविवारी ता. २६ रोजी मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात पार पडला. वारकरी संप्रदायाचे संस्थापक ब्रह्मकालीन पुरूषोत्तम महाराज पाटील (बापू) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे वास्तू निर्मितीकार्य करण्यात आले असून, वारकऱ्यांची अनेक वर्षांची प्रतिक्षा पूर्ण झाली आहे. या भवनाच्या उभारणीसाठी खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष पुढाकारातून तसेच राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एकूण १५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून सुसज्ज आणि भव्य अशा वारकरी भवनाचे बांधकाम पूर्ण होताच उद्‌घाटनाचा मान भारत पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळाचे चेअरमन सुनील तटकरे तसेच माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना मिळाला. उद्‌घाटन कार्यक्रमास ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त योगी निरंजननाथ गुरू शांतीनाथ, कोकण दिंडीचे अध्यक्ष विजय मोरे, सचिव मधुकर पाटील, खजिनदार विनोद पाशिलकर यांच्यासह विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ह.भ.प. महादेव सानप यांनी प्रभावीपणे केले. या भवनामुळे कोकणातून आळंदी येथे येणाऱ्या वारकऱ्यांची निवास, भोजन, सुविधा यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. आमच्या भावभावनांना आधार देणारे हे एक स्थायी स्मारक आहे. अनेक वर्षांची आशा आज पूर्णत्वाला आली, अशी भावना वारकरी बांधवांनी व्यक्त केली. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी रूपेश मनोहर बामुगडे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे प्रशंसोद्गार या प्रसंगी काढण्यात आले. वारकरी पंथातील अध्यात्मिक संस्कार, दिंडी परंपरा आणि समाजकार्याचे केंद्र म्हणून हे भवन भविष्यात नवी ओळख निर्माण करील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
....................
किल्ले पन्हळघर दुर्गावर दीपोत्सव साजरा
माणगाव (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील लोणेरे जवळ वसलेला ऐतिहासिक किल्ले पन्हळघर दुर्ग यावर्षी दीपोत्सवाच्या जल्लोषाने उजळून निघाला. ‘स्वराज्याचा मावळा प्रतिष्ठान’ या संस्थेच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव आणि मशाल ज्योत महोत्सवात इतिहास जणू पुन्हा जिवंत झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. गेल्या पाच वर्षांपासून संस्थेमार्फत किल्ल्याचे संवर्धन, स्वच्छता, ऐतिहासिक अवशेषांचा शोध आणि जतनाचे कार्य सातत्याने सुरू आहे. आतापर्यंत दहा जुनी जल टाकी शोधण्यात यश आले असून त्यापैकी सात टाक्यांमधील गाळ पूर्णपणे काढून स्वच्छता मोहीम पूर्ण झाली आहे. उर्वरित जलटाक्यांचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती संस्थेने दिली. २५ ऑक्टोबरच्या सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि आई भवानीच्या जयघोषात कार्यक्रमाची सुरूवात झाली. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या गजरात, दिवट्यांच्या आणि मशालींच्या प्रकाशाने संपूर्ण किल्ला तेजोमय झाला. सुमारे ५०-६० शिवभक्त मावळ्यांनी “एक रात्र माझ्या राज्यासाठी” या भावनेने हा दीपोत्सव साजरा केला. भोजन व्यवस्था, भजन-कीर्तन कार्यक्रम यांच्या माध्यमातून भक्तीमय वातावरणात रात्र उत्साहात पार पडली. पन्हळघर ग्रामस्थदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com