नवी मुंबईत शिवसेना (शिंदे गट) मध्ये पदवाटपाचा प्रश्न ऐरणीवर

नवी मुंबईत शिवसेना (शिंदे गट) मध्ये पदवाटपाचा प्रश्न ऐरणीवर

Published on

नवी मुंबईत शिवसेनेमध्ये पदवाटपाचा प्रश्न ऐरणीवर
माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी; पक्षात तणावाचे वातावरण
वाशी, ता. २८ (बातमीदार) : विधानसभा निवडणुकीनंतर नवी मुंबईतील शिवसेना शिंदे गटामध्ये झालेल्या फेरबदलानंतर अद्याप अनेक पदाधिकाऱ्यांना पदवाटप न झाल्याने नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. जिल्हाध्यक्षपदी ऐरोलीत द्वारकानाथ भोईर आणि बेलापूरमध्ये किशोर पाटकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतरही उबाटा गट, काँग्रेस आणि इतर पक्षांतील माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान, पक्षप्रवेश करून महिना उलटूनही त्यांना पदे न दिल्याने असंतोष वाढत चालला आहे.
शिवसेनेत आलेले हे माजी नगरसेवक अद्याप त्यांच्या ‘माजी नगरसेवक’ या पदाचीच ओळख वापरून निवेदने देतात. पक्षाकडून अधिकृत पद न मिळाल्याने त्यांच्या कामात अडचणी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटात मोठी बंडखोरी पाहायला मिळाली होती. त्या वेळी शिवसेनेचे माजी उपनेते विजय नाहटा यांनी बेलापूर मतदारसंघातून उमेदवारीसाठी बंड केले. परिणामी त्यांच्यावर कारवाई करून त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले होते. तसेच तत्कालीन जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून ऐरोलीत रिंगणात उतरले होते. ठाणे जिल्ह्यात तब्बल ५० हजार मते मिळवल्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात स्थान देत उपनेते पदावर नियुक्त केले गेले. त्याचप्रमाणे नाहटा यांनाही पुनःप्रवेश देऊन उपनेते पद बहाल करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांच्या माध्यमातून मोठा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यात उबाठा गट व काँग्रेसमधील १२ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. त्या वेळी पदवाटपाचे आश्वासन दिले गेले होते, मात्र आजही प्रत्यक्षात कोणताही बदल झालेला नसल्याने नाराजी शिगेला पोहोचली आहे. अलीकडेच ऐरोलीतून निवडणूक लढविलेले अंकुश कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना तत्काळ नवी मुंबई संपर्कप्रमुख पद देण्यात आले. त्यामुळे त्यांच्यापूर्वी पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचा रोष अधिकच वाढला आहे.
..............
पालिका निवडणूक जवळ; पक्षातील असंतोष वाढण्याची शक्यता
भाजपने पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवाटप पूर्ण केले आहे. त्यामुळे शिंदे सेनेत पदवाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाराज कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेल्यास पालिका निवडणुकीत त्याचा परिणाम दिसू शकतो, अशी भीती वरिष्ठ नेत्यांना आहे. पूर्वी शिवसेनेत जिल्हाध्यक्ष स्वतः पदांची निवड करायचे, मात्र आता केंद्रीय नेतृत्वाकडून पदवाटप होईल, असे बेलापूर जिल्‍हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com