नेरुळ उड्डाणपुलाखाली अनधिकृत पार्किंग
नेरूळ उड्डाणपुलाखाली बेकायदा पार्किंग
वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष; नागरिकांची कारवाईची मागणी
जुईनगर, ता. २८ (बातमीदार) : नेरूळ येथील सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाखाली अनधिकृत वाहन पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाशांसह महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. या उड्डाणपुलाखाली मुंबईकडे जाणाऱ्या दिशेला वाहतूक पोलिस नियमित तपासणी करताना दिसतात; विरुद्ध दिशेला मात्र बिनधास्तपणे वाहने उभी राहतात. ही वाहने केवळ पार्कच केली जात नाहीत, तर अवैध पुणे–मुंबई प्रवासी वाहतूकही करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, येथे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर अनेकदा कारवाई होताना दिसते. महिला व पुरुष वाहतूक कर्मचारी इथे दिवसभर उपस्थित असतात. तरीदेखील या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नसल्याने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खासगी नावाने नोंदणीकृत असणारी ही वाहने प्रवासी परवाना, परमिट, पोल्युशन सर्टिफिकेट यांसारख्या अनिवार्य कागदपत्रांशिवाय धावतात. एवढेच नव्हे तर वाहतूक विभाग व आरटीओचे नियम धाब्यावर बसवत प्रवाशांचे जीव धोक्यात घालून ही वाहने बेकायदा व्यावसायिक वाहतूक करीत आहेत.
या भागातून कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापुरासह राज्यातील विविध भागांत जाणाऱ्या वाहनांची व प्रवाशांची मोठी वर्दळ असते. लाखो प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करीत असतात. त्यामुळे बेकायदा उभी केलेली वाहने महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. अनेकदा वाहतुकीचा वेग मंदावून अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता वाढते.
..................
अनधिकृत पार्किंगचा त्रास इतक्यावरच थांबत नाही, तर येथे वाढत्या प्रमाणात गुन्हेगारी व्यवहारही होत असल्याची नागरिकांकडून तक्रार आहे. गर्दीचा फायदा घेत पाकीटमारी, मंगळसूत्र चोरी असे गुन्हे घडत असतात. प्रवाशांनी सतर्क राहावे म्हणून स्थानिक पोलिसांनी फलकही उभारले आहेत; परंतु प्रत्यक्षात वाहनांवरील कारवाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचे चित्र आहे.
वाहतूक विभागाच्या निष्क्रियतेमुळे बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. यामुळे सरकारी परिवहन सेवेलाही फटका बसत असून, अधिकृतरीत्या प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्वरित कठोर कारवाई करून हा प्रकार आटोक्यात आणावा, अशी मागणी अधिक जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

