‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे निधन
‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे निधन
दहिसरमध्ये अंत्यसंस्कार; अंत्यदर्शनाला मान्यवरांची उपस्थिती
मुंबई, ता. २८ ः मालवणी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार फडकावणारे ज्येष्ठ नाटककार आणि ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर (वय ८६) यांचे साेमवारी रात्री उशिरा दहिसर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. दहिसरमधील दौलतनगर स्मशानभूमीत मंगळवारी (ता. २८) सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी राजकीय, नाट्य-चित्रपट क्षेत्रातील नामवंत मंडळी त्यांना अखेरचा निराेप देण्यासाठी उपस्थित हाेते.
आपल्या सिद्धहस्त लेखणीतून मालवणी भाषेच्या ठसकेबाज शैलीची त्यांनी मराठी रंगभूमीबरोबरच जगाला ओळख करून दिली. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे पार्थिव बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
रसिकांना आपल्या नाट्यकृतींतून खळखळून हसायला लावणाऱ्या गवाणकर यांना शेवटचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार, भद्रकाली प्राॅडक्शनचे प्रसाद कांबळी, अभिनेता समीर चौघुले, राजकीय नेते विनोद घोसाळकर, अभिनेता पंढरीनाथ कांबळी ऊर्फ पॅडी, अभिनेते प्रदीप कबरे आदी मान्यवर मंडळींनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. आमच्या बाबांचा स्वभाव मनमिळावू होता. सगळ्यांशी हसतखेळत ते राहायचे. त्यांची कलाक्षेत्राबराेबरच राजकीय क्षेत्रातही अनेक मित्र हाेते. ते रुग्णालयात असताना अनेकांनी मदतीचा हात दिला, असे त्यांचा मुलगा स्वप्नील गवाणकर यांनी सांगितले.
गंगाराम गवाणकर यांचे ‘वस्त्रहरण’ हे नाटक रंगभूमीवर अजरामर झाले. ग्रामीण माणसाचा विनोद, त्याची व्यथा, त्याचे साधेपणा आणि जगण्याची उमेद त्यांच्या संवादांमधून झळकली. त्यांच्या लेखणीत कोकणच्या मातीतली नाती, मिठास आणि माणुसकीचा सुगंध होता. ‘वस्त्रहरण’च्या रूपाने पहिल्यांदाच मालवणी भाषेतील नाटक व्यावसायिक रंगभूमीवर लोकप्रिय करण्याचे श्रेय गवाणकर यांना जाते. प्रेक्षक, समीक्षक आणि नाट्यसंस्थांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. प्रादेशिक भाषेच्या नाटकांना मिळणारा दर्जा आणि गौरव वाढवण्यात त्यांचा वाटा महत्त्वाचा ठरला. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन ‘मानाची संघटना लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

