पालघरमध्ये मतदारसंख्येत एक लाखांची वाढ

पालघरमध्ये मतदारसंख्येत एक लाखांची वाढ
Published on

पालघर, ता. १ : जिल्ह्यात यावर्षी मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे मतदार यादीतून समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील मतदारसंख्या आता २४ लाख दोन हजार १३ असून एक लाखांच्या जवळपास नवीन मतदारांची भर पडली आहे. लोकसंख्येतील वाढ, स्थलांतर आणि तरुण मतदारांची नव्याने झालेली नोंदणी ही या वाढीमागील प्रमुख कारणे आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते ऑक्टोबरपर्यंतची ही वाढ झाली आहे.

जिल्हा निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, एकूण मतदारसंख्येत ही निव्वळ वाढ दिसून येते. सर्वाधिक मतदार नालासोपारा मतदारसंघांमध्ये वाढले असून त्या खालोखाल डहाणू, बोईसर आणि वसई या विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी झाली आहे. विक्रमगड, पालघर या मतदारसंघांमध्ये नवीन मतदाराची नोंदणी कमी प्रमाणात आहे. विधानसभा निवडणुकीवेळी सहा मतदारसंघामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ दरम्यान २२ लाख ९२ हजार ६६ मतदारांची नोंद होती. आता २९ ऑक्टोबरपर्यंत ही संख्या २४ लाख दोन हजार १३ वर पोहोचली आहे.

निवडणूक आयोगाने राबवलेल्या ऑनलाईन आणि घरपोच नोंदणी मोहिमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेषतः १८ ते २५ वयोगटातील तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदारयादीत आपली नावे समाविष्ट केली आहेत. जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जनजागृती कार्यक्रम राबवले. यामुळे तरुणांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढताना दिसतो.

स्थलांतरितांची संख्या मोठी
वसई-विरार, बोईसर, नालासोपारा, डहाणू आणि तलासरी या भागात शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. नवीन गृहप्रकल्प आणि औद्योगिक विकासामुळे या भागात स्थलांतर वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर नव्या नागरिकांची मतदार नोंदणी वाढली आहे. मुंबईजवळचा जिल्हा असल्याने रोजगार आणि शिक्षणाच्या संधींसाठी अनेक कुटुंबे पालघरमध्ये स्थायिक होत आहेत.

यादी तपासणीची मागणी
काही ठिकाणी मतदारसंख्येतील अचानक वाढीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदारांची वाढ मोठी झाल्याने बोगस नोंदी किंवा दुबार नावे, मृतांची नावे कमी न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक राजकीय नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तपासणीची मागणी केली आहे.

याद्या तपासण्याचे काम
संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पारदर्शक रितीने पार पडली आहे. सर्व नावे ई-प्रणालीद्वारे पडताळणी करूनच यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. नागरिकांना तक्रारीसाठी विशेष मदतकेंद्र आणि ई-मेल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याद्या तपासण्याचे काम सुरूच आहे, असे प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस चव्हाण यांनी सांगितले.

मतदार यादीमध्ये अनेक चुका असून हा घोळ समोर आला आहे. मतदार यादीचे पुनःनिरीक्षण करावे आणि याद्या दुरुस्त कराव्यात, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
- सुनील भुसारा, माजी आमदार

गेल्या वर्षातील मतदारांची आकडेवारी
नाव नोंदणीसाठी अर्ज २.२५ लाख
अर्ज मान्य १.३० लाख
अर्ज बाद ९१ हजार
विविध कारणांमुळे नावे रद्द १६ हजार
नावे वगळली १.७ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com