आजदे गावात पाण्याची टंचाई
आजदे गावात तीव्र पाणीटंचाई
रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात
डोंबिवली, ता. १ : डोंबिवलीजवळील आजदे गावातील जयराम स्मृती इमारतीतील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येने हैराण आहेत. केडीएमसी जलवाहिनीच्या शेवटच्या टोकाला ही इमारत असल्याने येथे पुरेसे पाणी पोहोचत नाही. कायमस्वरूपी तोडगा काढण्यात पाणीपुरवठा विभागाला यश येत नसल्याने येथील २१ कुटुंबीयांना आता आंदोलनाचे हत्यार उपसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
नियमाप्रमाणे दोन वाहिन्या जोडलेल्या असूनही जयराम स्मृती इमारतीला कधीही पुरेसे पाणी मिळत नाही. रहिवासी विहित वेळेत पाण्याचे बिल भरतात, परंतु धरणांमध्ये पुरेसा साठा असतानाही तळ टाकीत फूटभरदेखील पाणी जमा होत नाही.
परिणामी, रहिवासी घरटी वर्गणी काढून तसेच वैयक्तिक छोटे टँकर मागवून पाण्याची तहान भागवत आहेत.
अनधिकृत जोडण्यांचा फटका
जयराम स्मृतीला बादलीभरही पाणी न येण्यामागे या भागातील नियमबाह्य जोडण्या हे प्रमुख कारण असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. केडीएमसीकडून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या लाइनला परिसरातील अनेक इमारतींनी दोनपेक्षा अधिक आणि मोठ्या व्यासाच्या लाइन जोडून त्या जमिनीत दडपून घेतल्या आहेत. यामुळे शेवटच्या टोकाला असलेल्या इमारतींना पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होतो. तळटाकी तर जेमतेम एक ते दीड फूटच भरते. जोपर्यंत जलवाहिनीद्वारे पुरेसे पाणी येत नाही तोपर्यंत महापालिकेने मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी रहिवाशांनी मागणी केली आहे.
पाण्याच्या मीटरने हवा मोजायची का?
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांनी रहिवाशांना कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी पाण्याचे मीटर बसवून घ्या, असा सल्ला दिला. यावर रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुळात इमारतीच्या तळटाकीला जोडलेल्या वाहिनीला पाण्याचा थेंबही येत नसताना मीटर जोडून हवा मोजणार का? अधिकारीवर्ग वारंवार तक्रारी करूनही टोलवाटोलवी करीत असल्याने रहिवाशांच्या संतापात भर पडत आहे.
आरोग्य धोक्यात
दीपावलीचा सण कसाबसा साजरा केल्यानंतर आता पाणीटंचाईची झळ अधिक प्रमाणात बसत आहे. घरचा खर्च परवडत नसताना दररोज विकतचे टँकर मागवणे सर्वसामान्य रहिवाशांना परवडण्यापलीकडे आहे. पाण्याची टंचाई असल्याने पिण्यासह अंघोळ आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, रहिवाशांचे आरोग्य धोक्याच्या उंबरठ्यावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

