मोखाड्यात बँकेसमोर मृत म्हैस आणुन शेतकऱ्याचे आंदोलन
म्हशीच्या विमा पैशांसाठी शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन
मोखाड्यात बँकेसमोर मृत म्हैस
मोखाडा, ता. १ (बातमीदार) : येथील टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी नवसू दिघा यांनी बँक ऑफ बडोदा (मोखाडा शाखा) आणि चोला मंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात मृत म्हैस बँकेसमोर आणून अनोखे आंदोलन केले. दिघा यांनी २०२२मध्ये बँकेकडून कर्ज घेऊन म्हशी खरेदी केल्या होत्या. त्यांचा विमादेखील काढला होता.
दिघा यांनी म्हशी खरेदी केल्यानंतर २०२३मध्ये एक आणि २०२५मध्ये एक अशा दोन म्हशी दगावल्या. परंतु विमा काढलेला असूनही बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या अडमुठेपणामुळे विम्याची नुकसानभरपाई रक्कम अद्याप मिळालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. नुकसानभरपाईचे पैसे द्या नाहीतर म्हैस परत घ्या, अशी भूमिका घेत दिघा यांनी मृत म्हस ट्रॅक्टरमध्ये आणून बँकेसमोर ठेवली आणि आपला रोष व्यक्त केला. या घटनेमुळे बँकेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि पोलिस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, घोसाळी आणि गुंबाडपाडा येथील इतर शेतकऱ्यांनाही दीड वर्षापासून विम्याची रक्कम मिळालेली नाही, असा आरोप केला आहे. या आंदोलनात नगराध्यक्ष अमोल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख यांच्यासह अनेक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
-------------------------
शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा
मागील काही वर्षांपूर्वी बँक ऑफ बडोदा मोखाडा शाखेतून म्हशींच्या खरेदीसाठी पैसे घेतलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकदाही म्हस मेल्यानंतर विम्याची रक्कम मिळालेली नाही, अशी गंभीर बाब समोर आली आहे. म्हस खरेदीनंतर वर्षभरात ती मेली तरी घेतलेले कर्ज व्याजासह पशुपालक शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसूल केले जाते. त्यामुळे बँक ऑफ बडोदा शाखेतील कर्मचाऱ्यांकडून अशीच जबरदस्ती चालू राहिली तर काही पशुपालक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा या वेळी पीडित पशुपालकांनी दिला आहे.
------------------------
मी एकतीस दिवसांत नवसू दिघा यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाईचे पैसे मिळवून देतो. तसेच इतरही नुकसानग्रस्त पशुपालक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला विमा कंपनीकडून मिळवून देणार आहे, असे लेखी स्वरूपात लिहून देतो.
- हरिचरण वडला, वरिष्ठ अधिकारी, बँक ऑफ बडोदा मोखाडा
-------------------------
आतापर्यंत माझ्या दोन म्हशी मेल्या आहेत. बँकेकडे याआधीही नुकसानभरपाई मिळावी म्हणून म्हशींचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर कागदपत्रे जमा केली होती; तरीदेखील नुकसानभरपाई मिळाली नाही. आता ३१ दिवसांत विम्याचे पैसे मिळाले नाही तर बँकेला टाळे लावून बँकेसमोर उपोषण करणार.
- नवसू दिघा, नुकसानग्रस्त पशुपालक शेतकरी

