ठिणगीचा वणवा भडकेल!
ठिणगीचा वणवा भडकेल!
मतचोरीवरून उद्धव ठाकरे यांचा इशारा; सत्ताधारी, निवडणूक आयोगावर टीका
मुंबई, ता. १ ः संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर पहिल्यांदाच राजकीय पक्षांची अशी एकजूट झाली आहे. आज मुंबईत मतचोरी करणाऱ्यांविरोधातील ही नुसती ‘ठिणगी’ आहे; पण तिचा वणवा कधी होईल, ते कळणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि मतचोरीला पाठीशी घालणाऱ्या निवडणूक आयोगाला दिला.
महाविकास आघाडीतील विविध पक्ष संघटनांनी काढलेल्या मतचोरीविरोधातील सत्याचा मोर्चात ते बोलत होते. सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला थेट लक्ष करून ठाकरे यांनी पुन्हा ‘ॲनाकोंडा’ या शब्दाचा वापर केला. ते म्हणाले, आता ॲनाकोंडाला कोंडावंच लागेल. यांची भूक क्षमत नाही. आपला पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, माझे वडील चोरायचा प्रयत्न केला. आता तेही पुरेसे नाही म्हणून आता मतचोरी करायला बघताहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
मतचोरीचे पुरावे आम्ही न्यायालयात देणार आहोत. तिथे न्याय मिळेल, अशी खात्री आहे; पण नाही मिळाला तर जनतेचे न्यायालय या मतचोरांचा निर्णय घ्यायला सक्षम असल्याचे सांगत त्यांनी ही मूठ महाराष्ट्राने आवळलेली आहे. जर मतचोरी करून निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल, तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.
--
मतचोरांना फटकवा
सदोष मतदार यादी आणि मतचोरी करून तुम्ही आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल, तर जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायच्या की नाही. यासाठी सगळ्यांनी आपापले नाव यादीत आहे की नाही, हे तपासा. तसेच आपल्या घरात आपल्याला न दिसणारी, परवानगी न घेतलेली माणसे राहतात की नाही, हेही तपासा. मतचोर जिकडे दिसेल, तिथल्या तिथे त्याला फटकवला पाहिजेच, असे आवाहन त्यांनी राज्यातील मतदारांना केले. तसेच कायद्याचा खोटा दंडुका मारणार असाल, तर त्या दंडुक्याचे काय करायचे हेही जनता ठरवेल, असेही ते म्हणाले.
-
आपल्या नावानेच मतचोरी
मतचोरीसाठी आपल्या नावाचा वापर कसा केला जातोय, यासाठी त्यांनी ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ यांच्या नावाने ऑनलाइन व्हेरिफिकेशनचा (सक्षम ॲपवरून) अर्ज करण्यात आला, जो त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला माहीत नाही. या अर्जावरचा मोबाईल नंबरही खोटा होता आणि हा अर्ज २३ ऑक्टोबर २०२५ रोजी दाखल झाला होता. याचा अर्थ खोट्या नंबरवरून ओटीपी काढून हे प्रकरण हॅक करण्याचा आणि माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावे मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न झाला आहे का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
--
मुख्यमंत्र्यांकडून मतचाेरी मान्य!
मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांनी कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतला, याचा ‘पर्दाफाश’ करतील, असे विधान केले होते. त्याचा समाचार घेत ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी मतचोरी मान्य केली आहे, त्यांना कोणता पर्दाफाश करायचा त्यांनी करावा, असे आव्हान केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

