पदपथांवर फेरीवाल्यांचे बस्तान

पदपथांवर फेरीवाल्यांचे बस्तान

Published on

पालघर, ता. १ ः जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालघर शहरात बेकायदा फेरीवाल्यांचे पेव वाढत चालले आहे. संध्याकाळच्या वेळी ऐन रहदारीच्या सुमारास शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या पदपथांवर या फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. शहरभर ही स्थिती असून पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागतो. अशावेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

पालघर शहर जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण झाल्यानंतर नगर परिषदेने विकासकामांच्या नावाखाली सर्वत्र मोठे रस्ते, गटार आणि पदपथ तयार केले. शहरात माहीम रस्ता, देवीसहाय रस्ता, कचेरी रस्ता, टेम्भोडे रस्ता असे प्रमुख मार्ग आणि पदपथ तयार केले. या प्रमुख रस्त्यांसह काही प्रभागांमध्ये अंतर्गत रस्ते गटार आणि पदपथ तयार केले गेले. सर्वसामान्य नागरिकांना हे पदपथ महत्त्वपूर्ण असताना या पदपथांवर फेरीवाल्यांनी बस्तान बसवले आहे. अलीकडच्या काळात नगर परिषद हद्दीत बेकायदा फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांसाठी ती डोकेदुखी ठरत आहे. रस्त्याच्या कडेला बसणारे फेरीवाले आपले सामान पदपथावर ठेवत असल्यामुळे पदपथ अडवून ठेवले जात आहेत, तर पदपथाच्या कडेला असलेले दुकानदारांमार्फत ही पदपथावर सामान ठेवले जात आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

जिल्हा मुख्यालय झाल्यानंतर पालघरच्या रस्त्यांवर सर्वत्र कोंडीची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथ चांगला पर्याय होता; मात्र आता पदपथांवर भाजीविक्रेते, खाद्यपदार्थांच्या गाड्या, फळविक्रेते व इतर प्रकारचे विक्रेते अशा फेरीवाल्यांनी गिळंकृत केल्यामुळे नागरिकांनी चालायचे कुठून, असा सवाल उपस्थित झाला आहे.

कोंडीतून चालण्याची नामुष्की
पदपथांवर फेरीवाले बसत असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागत आहे. संध्याकाळच्या वेळेस पदपथांवर मोठ्या प्रमाणावर फेरीवाले विक्रेते आपले बस्तान बसवत आहेत. याच वेळेला नोकरवर्गासह सर्वसामान्य नागरिकांची ही मोठी गर्दी रस्त्यांवर पाहायला मिळते. अशावेळी पदपथ अतिक्रमणाने भरलेले असल्यामुळे नागरिकांना चालणे जिकिरीचे होऊन बसले आहे.

या ठिकाणी सर्वाधिक हाल
पालघर रेल्वेस्थानक ते कमला पार्क नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पदपथांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची रेलचेल आहे, तर देवीसहाय रोड ते मधुबन इमारतीपर्यंत पदपथांवर ट्रक व इतर सामान असल्याने तेथून चालणे नागरिकांना अशक्य होत आहे. मधुबनपासून पुढे पदपथ अस्तित्वात असले तरी या पदपथांची दुरवस्था झाल्याने नागरिक त्यावरून चालणे पसंत करीत नाहीत.

जोपर्यंत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन रस्त्यावर उतरून, नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार नाही, तोवर समस्याग्रस्त स्थिती कायम राहणार आहे. उदासीनता झटकून समस्या जाणणे आवश्यक आहे.
- प्रीतम राऊत, नागरिक, अल्याळी

नागरिकांसाठी पदपथ खुले करून देण्याच्या दृष्टीने लक्ष घातले जाईल. फेरीवाल्यांना प्रशासनामार्फत समज दिली जाईल. त्यानंतर न ऐकल्यास दंड आणि कारवाई करू.
- प्रशांत जाधव, मुख्याधिकारी, पालघर नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com