कल्याण-मुरबाड महामार्गावरील वाहतुकीत बदल
कल्याण-मुरबाड महामार्गावरील वाहतुकीत बदल
वाहतूक विभागाची महत्त्वाची अधिसूचना जारी
उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) ः उल्हासनगरातील शहाड उड्डाणपुलाच्या डांबरीकरणाच्या कामामुळे पुढील २० दिवस वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ३ ते २३ नोव्हेंबरपर्यंत शहाड उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण-माळशेज महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. नागरिकांना अडचण होऊ नये, यासाठी वाहतुकीचे काटेकोर नियोजन आणि पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
ठाणे येथील राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या मार्फत मे. संरचना कंपनीतर्फे शहाड उड्डाणपुलावर डांबरीकरणाचे महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. या कामाचा कालावधी रविवारी (ता. २) रात्री १२ पासून रविवारी (ता. २३) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत निश्चित केला आहे. या काळात पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
कल्याण-माळशेज महामार्ग हा उल्हासनगरसह ठाणे जिल्ह्याला अहमदनगर व पुण्याकडे जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या कामादरम्यान नागरिकांना गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. वाहतूक पोलिसांनी या काळात सर्व मार्गांवर दिशादर्शक फलक, मार्गदर्शन बोर्ड आणि रिफ्लेक्टरसह सूचना चिन्हे बसविण्याची तयारी केली आहे. ३ ते २३ नोव्हेंबरदरम्यान वाहनचालकांना थोडा संयम ठेवावा लागणार असला, तरी या कामानंतर शहाड पुलावरून प्रवास अधिक सुखद होईल. ठाणे वाहतूक विभाग व महामार्ग प्राधिकरणाने नागरिकांना दिलेल्या सूचनांचे पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
वाहतूक बंदी आणि पर्यायी मार्गांचे तपशील
१) माळशेजकडून कल्याणकडे येणारी वाहने
प्रवेश बंद ठिकाण ः डॅम फाटा, मुरबाड (ठाणे ग्रामीण हद्द)
पर्यायी मार्ग ः डॅम फाटा - बदलापूर रोड - पालेगाव - नेवाळी नाका - मलंग रोड - लोढा पलावा / शिळ-डायघर रोड / पत्रीपूल - कल्याण
२) मुरबाडकडून शहाड पुलावरून कल्याणकडे येणारी वाहने
प्रवेश बंद ठिकाण ः दहागाव फाटा (रायतागाव)
पर्यायी मार्ग ः दहागाव फाटा - वाहोळी - मांजर्ली - एरंजडगाव - बदलापूर - पालेगाव - नेवाळी नाका - मलंग रोड - लोढा पलावा / शिळ-डायघर रोड - पत्रीपूल - कल्याण
३) कल्याणकडून मुरबाडकडे जाणारी वाहने
प्रवेश बंद ठिकाण ः दुर्गाडी पूल, कल्याण
पर्यायी मार्ग ः दुर्गाडी पूल - गोविंदवाडी बायपास - नेवाळी - पालेगाव - बदलापूरमार्गे - मुरबाड
जड वाहनांसाठी विशेष मर्यादा
या पर्यायी मार्गांवर जड व अवजड वाहनांना
सकाळी ०६.०० ते ११.०० आणि
सायंकाळी १७.०० ते २२.००
या वेळेत प्रवेश बंद राहील. या वेळेत केवळ लहान वाहनांना परवानगी असेल.
अत्यावश्यक सेवांना मुभा
ही अधिसूचना पोलिस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक सेवा अखंडित सुरू राहतील.
प्रशासनाचे आवाहन
ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले, की शहाड उड्डाणपुलावरील डांबरीकरण हे जनहिताचे व अत्यावश्यक काम आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस पथके सतत गस्त घालतील आणि मार्गदर्शन करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

