बेकायदा गॅरेजकडे कानाडोळा

बेकायदा गॅरेजकडे कानाडोळा

Published on

भाईंदर, ता. २ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर बेकायदा वाहन दुरुस्तीची गॅरेज थाटण्यात आली आहेत. या गॅरेजमुळे कोंडीला निमंत्रण तर मिळतच आहे, शिवाय नागरिकांना रस्त्यावरून चालणेदेखील अडचणीचे ठरत आहे. रस्त्यांवर वाहन दुरुस्ती करण्यास महापालिकेकडून मनाई करण्यात आली आहे, तसा प्रस्तावही महासभेने मंजूर केला आहे, मात्र त्यानंतरही महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांकडून या बेकायदा गॅरेजकडे कानाडोळा केला जात आहे.

शहरात दुचाकी, चारचाकी, तसेच रिक्षांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यासोबतच त्यांच्या दुरुस्तीच्या गॅरेजची संख्याही वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी ही गॅरेज मोकळ्या जागेत अथवा बंदिस्त जागेत न चालवता चक्क रस्त्यावरच थाटण्यात आली आहेत. काही ठिकाणी तर वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्या दुकानांसमोरच ही अनधिकृत वाहन दुरुस्ती सुरू करण्यात आली आहेत. दुरुस्तीसाठी आलेली वाहने रस्त्यातच दुरुस्त केली जात असल्याने रस्त्याचा बराचसा भाग अडवला जात आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. पदपथांचीदेखील हीच अवस्था असल्याने नागरिकांनाही चालणे अवघड बनले आहे.

रस्त्यावर वाहन दुरुस्ती केल्यास महापालिकेकडून दंडात्मक आणि वाहन जप्तीची कारवाई करण्याची तरतूदही या ठरावात करण्यात आली आहे, परंतु या ठरावाची अंमलबजावणी प्रभाग अधिकारी करत नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर आणि पदपथांवर वाहन दुरुस्ती गॅरेज बेधडकपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अधूनमधून बेकायदा गॅरेजवर देखाव्यापुरती कारवाई केली जाते, मात्र काही दिवसांत पुन्हा गॅरेज सुरू केली जात आहेत. त्यामुळे यामागे अर्थकारण दडले आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

प्रभाग अधिकाऱ्यांवर जबाबदारी
वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत गॅरेजवर कारवाई करण्याचा ठराव महासभेने २०१८ मध्ये मंजूर केला आहे. त्यानुसार प्रत्येक विभागातील प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

गॅरेजमालकावर जबाबदारी
महासभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार कोणालाही रस्त्यावर वाहन दुरुस्ती करता येणार नाही. वाहन दुरुस्ती केवळ स्वत:च्या अथवा खासगी मालकीच्या जागेतच करावी लागेल, शिवाय वाहन दुरुस्तीमधून निर्माण होणारा कचरा रस्त्यावर येणार नाही, याची जबाबदारीदेखील गॅरेजमालकाचीच आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे हाल
वाहन दुरुस्त करत असताना वाहनातील तेल, ग्रीस रस्त्यावरच पडत असते, तसेच कचराही निर्माण होतो. त्यामुळे रस्तेही खराब होतात. शहरातील रस्ते दररोज सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ केले जातात, परंतु अनधिकृत गॅरेजमध्ये दुरुस्तीला आलेली वाहने रस्त्यातच उभी असल्याने रस्ते स्वच्छ करणेही कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही.

शहरातील अनधिकृत बांधकाम, फेरीवाले याविरोधात कारवाई सुरू आहे. रस्त्यावरील अनधिकृत गॅरेजवरदेखील लवकरच कारवाई केली जाईल.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com