पर्यावरणपूरक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार

पर्यावरणपूरक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार

Published on

विरार, ता. २ (बातमीदार) : वसई-विरारमध्ये मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आतापर्यंत विद्युतदाहिनी, गॅसदाहिनी, तसेच लाकडाची दाहिनी आहे, मात्र नागरिकांचा अद्यापही कल हा लाकडाच्या दाहिनीवर अंत्यसंकार करण्याचा असल्याने प्रदूषण वाढते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरात अंत्यसंस्कार करण्यासाठी पर्यावरणपूरक स्मशानभूमी तयार करण्यात येत आहेत. यासाठी सौरऊर्जेवर चालणारी दाहिनी उभारणार असल्याने विजेचीही बचत होणार आहे. सुरुवातीला पाच ठिकाणी स्मशानभूमी तयार करण्यात येत असून, यासाठी सहा कोटी ३५ लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

वसई-विरार शहरात विविध ठिकाणी मृतांवर अंत्यसंस्कारासाठी शंभरहून अधिक स्मशानभूमी बांधल्या आहेत. काही ठिकाणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधीच्या वेळी निघणारा धूर बाहेर सोडण्यासाठी चिमण्याही बसविण्यात आल्या नाहीत, यामुळे हा धूर आजूबाजूच्या भागात व नागरी वस्तीच्या भागात पसरतो, तर काही ठिकाणी स्मशानभूमीची दुरवस्था यासह सुविधांचा अभाव जाणवतो. याबाबत अनेकदा नागरिक पालिकेकडे तक्रारी करतात. शहरातील प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी त्यावर विविध अंगाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याच एक भाग म्हणून आता काही भागात पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार प्रणालीच्या अंतर्गत स्मशानभूमीत विकसित करण्यावर भर दिला जात आहे.

जिल्हा नियोजनमधून निधी
पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणांची निवड करून त्या ठिकाणी या स्मशानभूमी तयार होत आहेत. यात अंत्यविधीसाठी लागणाऱ्या दाहिन्या, चिमणी, फरनेच, ट्रे, सोलार यासह इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या स्मशानभूमीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध झाला आहे. मोडकळीस आलेल्या स्मशानभूमी दुरुस्त करण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात आहे, असे पालिकेने सांगितले.

धूरमुक्त अंत्यसंस्कार
स्मशानभूमीमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ४०० ते ५०० किलो लाकडे लागत होती, मात्र आता केवळ १०० ते १२५ किलो लाकडे लागणार आहेत. ज्या अंत्यविधीच्या प्रक्रिया आहेत, त्या तशाच होतील. ते झाल्यानंतर सरणावर ठेवलेला मृतदेह हा पेटीत टाकून विधी पार पाडता येणार आहे. यातून धूरसुद्धा निघणार नाही. यामुळे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे.

प्राण्यांसाठी स्मशानभूमी
मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. यामुळे स्थानिक नागरिक, तसेच प्राणिप्रेमींकडून सातत्याने प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारण्याची मागणी केली जात होती. आता शहरात प्राण्याच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आता ही स्मशानभूमी घनकचरा प्रकल्प आहे, त्याच ठिकाणच्या जागेत उभारला जाणार आहे, पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

शहरातील स्मशानभूमीत लाकडांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी नवनवे प्रयोग करत आहोत. याचाच एक भाग म्हणजे पर्यावरणपूरक स्मशानभूमी होय. यामुळे लाकडांची बचत होणार असून, प्रदूषणही कमी होणार आहे. याचबरोबर पालिका हद्दीत आम्ही प्राण्यांसाठीही स्मशानभूमी तयार करत आहोत.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त, वसई-विरार महापालिका

या ठिकाणी स्मशानभूमी
वसई पूर्वेच्या गोखीवरे देवीचा पाडा, पापडी, देवाळे, समेळपाडा नालासोपारा

निधी मंजूर
सहा कोटी ३५ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com