जुन्या वैराचा सूड, भररस्त्यात खून!

जुन्या वैराचा सूड, भररस्त्यात खून!

Published on

पाठलाग

जुन्या वैराचा सूड, भररस्त्यात खून!

जुन्या वैराच्या सूडातून उल्हासनगरमध्ये एका तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. धारदार कैचीने केलेल्या सलग वारांनी ३५ वर्षीय भरत दुसेजा याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने शहरात भीतीचे सावट पसरले. मात्र, पोलिसांनी अवघ्या पाच तासांत आरोपीला गजाआड करण्यात यश मिळवले.

-----------------------------------
नवनीत बऱ्हाटे

रात्र शांत होती. उल्हासनगरचा कॅम्प ५ परिसर झोपेत बुडालेला. कैलास कॉलनीत दिव्यांचा पिवळसर प्रकाश हलक्या धुक्यात विरघळत होता. पण त्या रात्रीच्या गारठेचे वातावरण अचानक एका किंचाळीने हादरले. वाचवा! मला वाचवा! महेश्वरी रुग्णालयासमोर रक्ताचा सडा रस्त्याला रंग देत होता आणि तडफडत होता ३५ वर्षीय भरत दुसेजा. त्याच्या हातावर, मानेवर, छातीवर सलग वार होते. काही क्षणांतच तो निश्चल झाला.

रात्री ११.३० वाजताच्या सुमारास महेश्वरी हॉस्पिटलसमोर दुसेजा दुचाकीवरून जात होता. त्याच्यावर दबा धरून बसलेला त्याचाच मित्र गौरव उडानशिवे अचानक समोर आला. त्याने गाडी थांबवली. समोर अंधुक प्रकाशात गौरवच्या हातात धारदार कैची होती. चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा; पण आत दडलेली ज्वाला होती. त्याने क्षणाचाही विलंब न लावता दुसेजावर सलग वार केले. रक्ताच्या धारा रस्त्यावर वाहू लागल्या. दुसेजा खाली कोसळताच गौरवने तेथून पलायन केले. आसपासच्या नागरिकांनी किंचाळत मदतीसाठी धाव घेतली. जखमी दुसेजा शुद्धीवर असतानाही ओरडत राहिला ‘मला वाचवा!’ पण त्या क्षणी परिसरात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नव्हती. स्थानिकांनी तत्परता दाखवत त्याला पहिले दुचाकीवर बसवले आणि नंतर रिक्षामार्फत उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवले; मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्याला मृत घोषित केले.
घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली. हिललाइन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप घटनास्थळी पोहोचले. पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक आयुक्त शैलेश काळे आणि अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार झाले. पोलिस निरीक्षक (गुन्हे) सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक गणेश मोरे, संग्राम मालकर, अंकुश सुरेवाड, अर्जुन जाधव यांच्या पथकाने तपास सुरू केला.
मोबाईल लोकेशन ट्रॅक केले. गौरव आणि त्याची पत्नी हत्येनंतर कल्याणकडे पळण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. मग सुरू झाला ‘ऑपरेशन पाठलाग’. उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, विठ्ठलवाडी परिसरात पोलिसांची शोधमोहीम राबवण्यात आली. मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग, नातेवाइकांची चौकशी, गुप्त माहितीदारांच्या मदतीने आणि सलग चौकशीनंतर अवघ्या पाच तासांत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यावेळी गौरव पळण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी अचूक सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

=======================

दोन आठवड्यांपूर्वीच्या वादाचा ‘सूड’
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्येमागील कारण समोर आले. दोन आठवड्यांपूर्वी या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. एका छोट्या भांडणाने पेट घेतला. भांडणाचा राग गौरवने मनात ठेवला. वादातून उफाळलेले वैर अखेर सूडाच्या रूपात आणि मग मृत्यूत बदलला. गौरवचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. हत्येनंतर तो पत्नीसह फरार होण्याची तयारी करत होता. त्याने आधीच पळून जाण्याचे नियोजन केले होते; मात्र पोलिसांच्या जलद कारवाईने त्याची सर्व योजना फसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com