कचरा संकलन नियोजनाकडे दुर्लक्ष
कचरा संकलन नियोजनाकडे दुर्लक्ष
धारावीत ठिकठिकाणी ढिगारे
धारावी, ता. २ (बातमीदार) : धारावीतील विविध विभागातील अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे विभागामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भर दिवाळीतही अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचून राहिले होते. रस्त्यावर टाकण्यात येत असलेल्या कचऱ्याचे संकलन करण्याचे नियोजन विस्कळित झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचरा दिसून येत आहे.
धारावीतील संत कक्कया मार्ग, धारावी मुख्य रस्ता, शास्त्री नगर, गोपीनाथ कॉलनी, महात्मा गांधी रोड, ९० फुटी रस्ता, ६० फुटी रस्ता, धारावी क्रॉस रोड, काळा किल्ला परिसर आदी ठिकाणी स्थानिक रहिवासी घरात जमा झालेला कचरा तसेच काही विभागात पालिकेने नेमलेल्या संस्थांतर्फे संकलित केलेला कचरा पालिकेने बनवलेल्या कचरा संकलनाच्या ठिकाणी टाकतात. ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण केले जात नसल्याने रस्त्यांवर टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामधील ओल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होत आहे.
कचऱ्यामुळे रस्त्यांवरून जाताना पादचाऱ्यांना नाकाला रुमाल लावावे लागते. पालिकेची कचरा संकलन करणारी वाहने मर्यादित आहेत. त्यामुळे जमलेला कचरा उचलण्यास दिरंगाई होत आहे. धारावीतील कचरा अनेक ठिकाणी दोन वेळेस उचलला जातो, तर अनेक ठिकाणी दिवसातून एकदाच कचरा उचलला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून आहेत.
माहीम-सायन लिंक रोडवर अनेक ठिकाणांहून कचरा आणून टाकला जात आहे. पालिका प्रशासनाने वाढत चाललेल्या कचऱ्याच्या प्रश्नावर गंभीरपणे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

