अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान
अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान
पोलादपूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल; पंचनामे युद्धपातळीवर सुरू
पोलादपूर, ता. २ (बातमीदार) ः गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने पोलादपूर तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. भातकापणीचा हंगाम सुरू असतानाच झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाले असून, शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडले आहेत.
सावित्री, ढवळी, कामथी, कोतवाल आणि तुर्भे विभागासह लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. यंदा पावसाचे प्रमाण अनियमित असल्याने उत्पादन आधीच घटले होते; त्यातच या अवकाळी पावसाने शेतीत पाणी साचल्याने दाणे कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. इगतपुरी, कोळंबा, पनवेल, एचएमटी या पारंपरिक वाणांसोबत इंद्रायणी आणि वाडा-कोलम या सुधारित वाणांचे पीक पूर्णपणे आडवे झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकांवर खर्च केला होता, परंतु आता त्यांना मोठे आर्थिक संकट भेडसावत आहे. कृषितज्ज्ञांच्या मते, पाणी ओसरल्यानंतरही पीक सावरण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुका प्रशासन आणि कृषी विभागाने नुकसानीचा पंचनामा जलद गतीने सुरू केला आहे. आतापर्यंत सुमारे २१०.२५ हेक्टर क्षेत्रफळाचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित भागाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांनी सांगितले.
..................
चौकट
भारतीय कृषी विमा कंपनीने यावर्षीच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी नवे निकष लागू केले आहेत. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी विभागाच्या उपस्थितीत एका गुंठ्यातील पिकाचे नमुने काढून हेक्टरी सरासरी उत्पादन निश्चित करून त्यानुसार शेतकऱ्यांना विमा रक्कम दिली जाणार आहे.
..............
शेतकऱ्यांची मागणी
नुकसानग्रस्त शेतांची तत्काळ पाहणी
कृषी विभागाकडून पंचनामे व भरपाई
वन्यजीवांपासून बचावासाठी संरक्षणात्मक उपाय
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व व्याजमाफी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

