महाराष्ट्राने रिचवली २२५ लाख लिटर बिअर

महाराष्ट्राने रिचवली २२५ लाख लिटर बिअर

Published on

महाराष्ट्राने रिचवली २२५ लाख लिटर बिअर
विदेशी मद्य महागल्याने  बिअरचा खप झपाट्याने वाढ

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : राज्यातील पेयसंस्कृतीत एक हळूहळू पण लक्षणीय असा बदल सुरू आहे. महागड्या विदेशी मद्यापासून ग्राहक आता परवडणाऱ्या बिअरकडे वळत आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांत राज्यात तब्बल २,१९५.५६ लाख बल्क लिटर बिअरविक्री झाली, गेल्या वर्षी याच कालावधीत ती १,९७०.७७ लाख लिटर विक्री झाली होती. म्हणजेच अवघ्या सहा महिन्यांत २२५ लाख लिटरची वाढ झाली आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, विदेशी मद्याच्या वाढत्या किमती, बदलती कररचना आणि तरुण पिढीची बदललेली जीवनशैली या वाढीमागील प्रमुख कारणे आहेत. पावसाळ्यातही बिअरचा खप टिकून राहिला, म्हणजे ग्राहकांची पसंती केवळ हंगामी नाही, तर सवयीचा भाग बनल्याचे या आकडेवारीतून दिसून आल्याचे उत्पादन शुल्क विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आगामी उन्हाळा आणि सणासुदीच्या काळात बिअरविक्रीत आणखी वाढ होईल, असा अंदाजही या अधिकाऱ्याने वर्तवला आहे. देशी मद्य आणि वाइनच्या विक्रीत थोडी वाढ झाली असली तरी एकंदरीत विदेशी मद्याची विक्री घटली आहे. त्या तुलनेत बिअरचा खप सातत्याने वाढत असून, ग्रामीण भागातही तिचा स्वीकार झपाट्याने वाढतो आहे.  

 
आकडे बोलतात (एप्रिल ते सप्टेंबर)
मद्याचा प्रकार २०२४ - २०२५ (लाख बल्क लिटरमध्ये)
देशी दारू १,९६१- २,१०९
विदेशी दारू १,५४३ - १,५०१
वाइन ४९ - ५५
बिअर १,९७०- २,१९५


अमरावती विभागात सर्वाधिक वाढ
राज्यातील सर्व प्रकारच्या मद्यांपैकी बिअरच्या विक्रीतच सर्वाधिक वाढ नोंदली गेली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील आठही विभागांमध्ये बिअरविक्री वाढली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी ही वाढ दहापट टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अमरावती विभागात बिअरविक्रीत सर्वाधिक वाढ झाली असून, त्यानंतर नाशिक आणि नागपूर विभागांचा क्रम लागतो. ठाणे आणि पुणे विभागांत शहरी ग्राहकांनी विक्रीत वाढ घडवली आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात ग्रामीण बाजारपेठांनी या वाढीला नवा वेग दिला आहे.

शहर (टक्क्यांमध्ये)
ठाणे - १२.१२
नाशिक- १५.२३
पुणे - ७.९०
कोल्हापूर- ७.३१
छत्रपती संभाजीनगर  विभाग - ७.५५  
नांदेड विभाग - ८.५८
नागपूर विभाग - १४.४४
अमरावती  विभाग - २२.०१

 
तरुणाई आणि ‘सोशल ड्रिंक’ संस्कृती
तरुणवर्गात बिअर आता मद्यापेक्षा ‘सोशल ड्रिंक’ म्हणून स्वीकारली जात आहे. ठाण्यातील एका रेस्टो-बार मालकाने सांगितले की, ‘तरुणाई आता रिलॅक्स होण्यासाठी बिअर घेतात. कार्यालयीने वेळेनंतर, विकेंडला किंवा छोट्या भेटीगाठींमध्ये बिअर पिणे सामान्य पर्याय बनला आहे. विशेषतः २५ ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये बिअर लोकप्रिय आहे. फुटबॉल, क्रिकेट सामना किंवा मित्र-मैत्रिणींसोबतच्या गेट-टुगेदरमध्ये बिअरचा ‘मग’ आता सवयीचा भाग झाला आहे.’


तेलंगणा अव्वल
देशातील बिअर बाजारात तेलंगणा अव्वल असून, २०१८-१९ मध्ये तेलंगणामध्ये सुमारे ३,९१२ लाख लिटर बिअरविक्री झाली. त्यानंतर कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात बिअरचा खप सातत्याने वाढत असल्याने तज्ज्ञांच्या मते राज्य लवकरच देशातील पहिल्या तीन राज्यांमध्ये स्थान मिळवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com