घरकुल लाभार्थ्यांचा हप्ता लटकला
जव्हार, ता. २ (बातमीदार) : तालुक्यात २०२५ ते २०२६ या चालू आर्थिक वर्षात ११ हजार ४८६ घरकुल प्रकरणे मंजूर झाली आहेत. हे प्रमाण मागील काही वर्षांच्या तुलनेत तिप्पट आहेत. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानही व्यक्त केले जात आहे, मात्र नव्या प्रणालीमुळे लाभार्थ्यांना हप्ता लटकल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले आहे.
घरकुल लाभार्थ्यांना जलद, पारदर्शक व डिजिटल पद्धतीने निधी वितरित करण्यासाठी ‘एसएनए स्पर्श’ ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे, मात्र त्याचा फटका जव्हार तालुक्यातील लाभार्थ्यांना बसत आहे. गेल्या महिनाभरापासून ६० टक्क्यांपेक्षा अधिक लाभार्थी अनुदानाकडे डोळे लावून बसले आहेत. दिवाळीत अनुदान मिळण्याची अपेक्षा अपयशी ठरल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी जलदरीत्या वितरणासाठी ‘एसएनए स्पर्श’ या प्रणालीचा वापर केला जात आहे. घरकुल अनुदानाचे वितरण आता या नव्या प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. पूर्वी घरकुल लाभार्थ्यांना ‘पीएफएमएस’द्वारे अनुदान वितरित केले जात होते, मात्र त्याऐवजी ‘स्पर्श’ प्रणालीचा वापर करण्याची सूचना शासन स्तरावरून देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत लाभार्थीना अनुदानाचा हप्ता मिळण्यास मोठा विलंब झाला.
जव्हार तालुक्यात जवळपास सहा हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी पदरमोड व उसनवारी करत घरकुलाचे काम पूर्णत्वाकडे नेले आहे. गेल्या महिन्यात संबंधित अभियंता यांनी प्रत्यक्ष पाहणी करत फोटो काढून ते संकेतस्थळावर अपलोडही केले, परंतु स्पर्श प्रणालीद्वारे अनुदान वितरण करण्याची भूमिका घेण्यात आल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत.
उसनवारीने घराचे काम
दिवाळीत अनुदान जमा होईल, या अपेक्षेने काहींनी नातलगांकडून उसनवारी करून घराचे काम केले होते. अनुदान न जमा झाल्याने नातलगांची नाराजी ओढून घ्यावी लागली आहे. शिवाय राखून ठेवलेले पैसे खर्च झाल्याने सण साजरा करताना आर्थिक कोंडी असा दुहेरी फटका बसला आहे.
घरकुल अनुदानाच्या वितरणासाठी एसएनए स्पर्श प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थीच्या खात्यात अनुदान जमा न करण्याची सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. लवकरच अनुदान जमा होण्याची अपेक्षा आहे.
- डी. एस. चित्ते, गटविकास अधिकारी, जव्हार

