जिल्हा परिषद निवडणुकीत भिवंडी ठरणार निर्णायक
भिवंडी, ता. २ (वार्ताहर) : ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. ५३ गटांचे आरक्षण आणि मतदारयादी अंतिम झाली आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यातील २१ गट निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडीचे २१, शहापूरचे १५, मुरबाडचे आठ, कल्याणचे पाच आणि अंबरनाथचे चार असे गट आहेत. यात भिवंडीचा सिंहाचा वाटा स्पष्ट दिसतो.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भिवंडी तालुक्यातून शिवसेना १०, भाजप आठ, राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि काँग्रेस एक सदस्य निवडून आले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या पक्षीय पडझडीत शिवसेनेचे पाच सदस्य शिंदे गटात, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य भाजपमध्ये गेला. त्यामुळे सध्याचे राजकीय गणित पूर्णपणे बदलले आहे. पूर्वी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज केली होती. मात्र, बंडखोरीनंतरचे बदललेले राजकीय चित्र पाहता भाजप ग्रामीण भागात वरचढ ठरताना दिसत आहे.
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे यांनी युतीच्या उमेदवार म्हणून सलग हॅट्ट्रिक विजय मिळवला. मात्र, या विजयात भाजप श्रमजीवी संघटनेचाही मोठा वाटा असल्याचे मानले जाते. सध्या भाजप आणि शिंदे गट दोघेही स्वतःला ‘जिल्ह्याचे मोठे भाऊ’ म्हणून मिरवत आहेत. मात्र, शिंदे गटातील नेते, उपनेते आणि जिल्हाप्रमुखांमधील अंतर्गत मतभेद निवडणुकीत मारक ठरू शकतात. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मविआची रणनीती
महाविकास आघाडीच्या पातळीवर ठाकरे गटाची ताकद भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यात मजबूत असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मान्य केले आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता दिसते. मात्र, काँग्रेसची भूमिका अद्याप अस्पष्ट असल्याने तिन्ही पक्षांत अंतिम समीकरण काय उभे राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भिवंडीचा विजय म्हणजे जिल्ह्यात सत्ता
ठाणे जिल्हा परिषदेतील एकूण सदस्य संख्येपैकी ४० टक्के फक्त भिवंडी तालुक्यातून निवडले जातात. त्यामुळे भिवंडीतील निकाल जिल्हा परिषदेवरील सत्तास्थापनेसाठी निर्णायक ठरणार हे निश्चित झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

