उल्हासनगरचे मनोज पवार ठाणे जिल्हाध्यक्षपदी

उल्हासनगरचे मनोज पवार ठाणे जिल्हाध्यक्षपदी

Published on

उल्हासनगर, ता. १२ (बातमीदार) : आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ राहिलेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कार्यकर्ते असलेले उल्हासनगरचे मनोज (मोनू) पवार यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा, राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ठाणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. वडार समाजातील मनोज पवार यांच्या या नियुक्तीमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
दिवंगत पांडू पवार यांचे चिरंजीव मनोज पवार हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. दरवर्षी ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर येणाऱ्या गोरगरिबांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. मनोज पवार हे राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टिंग खेळाडू असून त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन सुवर्णपदक पटकावले आहे. क्रीडा क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही ते अग्रस्थानी आहेत. आपल्या मोठ्या भावासोबत सोनू पवार यांच्या मदतीने त्यांनी उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरातील महात्मा फुले कॉलनी येथे गोरगरीब तरुणांसाठी व्यायामशाळेची स्थापना केली आहे. तसेच, गरजू रुग्णांच्या सेवेसाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध ठेवली आहे. मुंबई भेटीत ॲड. आंबेडकर यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन मनोज पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल जाधव यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. पक्षाचे महासचिव किसन चव्हाण यांनी त्यांची ठाणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या अखत्यारीत उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या विभागांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्याची जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर, डॉ. अनिल जाधव, किसन चव्हाण आणि महेश भारतीया यांचे आभार मानले. मी पक्षवाढीसाठी तत्पर राहणार असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी जनाधार असणाऱ्या उमेदवारांची शिफारस करणार आहे, असे मनोज पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com