ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर वाहतूक विभागाचा कारवाईचा बडगा
ठाण्याच्या रस्त्यांवर अपघाताचा धोका
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ११ हजारांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
ठाणे शहर, ता. १२ (बातमीदार) ः दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या दुचाकी आणि रिक्षा चालकांची असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अशा वाहन चालकांकडून इतरांच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याची चिंता ठाण्यात पसरली आहे. अवघ्या दहा महिन्यात ठाणे शहरात वाहतूक पोलिसांनी पाच हजार ४४१ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दारू प्राशन करून टोईंग व्हॅन चालवणाऱ्या ६१ चालकांवरही वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ११ हजारांहून अधिक जणांवर कारवाई केली आहे.
दारू पिऊन वाहन चालवणे कायद्याने गुन्हा आहे. अशा चालकांकडून स्वतःसह इतरांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाते. वाहतुकीला धोका निर्माण करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ठिकाठिकाणी नाकाबंदी केली जाते. १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ठाणे शहरातून एकूण ११ हजारांहून अधिक जणांना ड्रंक अँड ड्राइव्हच्या गुन्ह्यात पकडून त्यांना दंड ठोठावला आहे. यात ऑनलाईन दंडाच्या कारवाईमध्ये सहा हजार ६८९ जणांचा समावेश आहे. हा कायदा मोडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक समावेश दुचाकी चालकांचा असल्याचे उघड झाले आहे. त्यापाठोपाठ रिक्षा चालक आणि चार चाकी वाहन चालकांचा समावेश आहे. दारू पिऊन ट्रॅक्टर चालवणाऱ्यांवरही वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली आहे. काँक्रीट मिक्सर सारख्या वाहनांचा गंभीर अपघात होण्यास कारणीभूत ठरणारे वाहने देखील दारू पिऊन चालवीत असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत समोर आला आहे. दरम्यान, या कारवाया ऑनलाईन दंडाच्या असून प्रत्यक्षात केलेल्या कारवायांची संख्या देखील मोठी असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले.
मद्य प्राशन करून वाहन चालवणे स्वतःच्या इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे हा धोका थांबविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली जाते. आगामी डिसेंबर महिन्याकरता वाहतूक पोलिसांनी कारवायांची गती वाढवली असून ठिकठिकाणी पुरेसे मनुष्यबळ आणि नाकाबंदी केल्या जाणार आहेत.
- पंकज शिरसाट, पोलिस उपायुक्त, वाहतूक
१० हजारांच्या दंडाची तरतूद
दारू पिऊन वाहन चालवताना आढळून आल्यास त्याच्यावर १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो.
दारू पिऊन चालविलेली वाहने :
दुचाकी - ४८०१
रिक्षा - ७१९
चार चाकी - ५२२
ट्रक - ४३५
टोईंग व्हॅन - ६१
अवजड वाहने - १०६
बस - २२
डंपर - ७
इतर ४३१७ (जागेवर दंडात्मक कारवाई केलेले)
कोट फोटो : पंकज शिरसाट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

