वाढवणजवळ बोटीला जलसमाधी

वाढवणजवळ बोटीला जलसमाधी

Published on

वाढवणजवळ बोटीला जलसमाधी
पाच खलाशांना वाचविण्यात यश; एक बेपत्ता

कासा/डहाणू, ता. १२ (बातमीदार) : मुंबई दारूखाना येथून शनिवारी (ता. ८) वाढवण येथे गस्तीसाठी निघालेली ‘अमृत-१६’ ही बोट वाढवण किनाऱ्याजवळ अंदाजे ७.५ नॉटिकल मैल (साधारण १३ किलोमीटर) अंतरावर थांबली असताना बुधवारी (ता. १२) पहाटे २च्या सुमारास या बोटीच्या इंजिन रूममध्ये अचानक पाणी शिरल्याने दुर्घटना घडली. यामध्ये सहा खलाशांपैकी पाच जणांना वाचवण्यात यश आले असून, एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे.

बोटीच्या इंजिन रूममध्ये पाणी शिरू लागल्याचे लक्षात येताच खलाशांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच बोटीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पवन विष्णू राम (वय २९), धर्मेंद्रकुमार नंदकिशोर सिंग (वय ४३), गोविंदकुमार विदेश्वर महतो (वय १९), सुरज विश्वकर्मा (वय ३८) आणि जदन रघुवीरसिंग पठाणीया (वय ३०) हे पाच खलाशी बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र राहुलकुमार यादव (वय २३) हा खलाशी बेपत्ता आहे. या खलाशांनी जवळ असलेल्या ‘अन्नपूर्णा’ या टगबोटकडून मदत मागितली. अन्नपूर्णा टगवरील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सर्व पाच जणांना सुरक्षित बोटीवर घेतले. दरम्यान, पहाटे ३च्या सुमारास सागरी बचाव समन्वय केंद्र, मुंबईला (एमआरसीसी) अमृत-१६ बुडाल्याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या डहाणू अवस्थानातून कमांडंट जितू आय. जोस यांच्या मार्गदर्शनाखाली आयसी-११७ ही बोट घटनास्थळी रवाना करण्यात आली. सकाळी ७च्या सुमारास तटरक्षक दलाने सर्व पाचही खलाशांना आपल्या ताब्यात घेतले आणि सकाळी ९ वाजता डहाणू किनाऱ्यावर आणले. सर्वांना तत्काळ डहाणू उपजिल्हा रुग्णालय, आगर येथे दाखल करण्यात आले. त्यापैकी तीन जणांची प्रकृती सुरुवातीला गंभीर होती; मात्र सध्या सर्व जणांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भोये यांनी सांगितले. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी बेपत्ता खलाशाचे शोधकार्य सुरू असल्याची माहिती दिली. दरम्यान, खडकाला आदळल्याने या बोटीत पाणी शिरल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


अमृत-१६ बोटीवरील आपत्कालीन संदेश मिळताच भारतीय तटरक्षक अवस्थान डहाणू, चिखले कार्यालयाचे कमांडंट जितू आय. जोस यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने तत्काळ प्रतिसाद देत बचावकार्य सुरू केले. आयसी-११७ या बोटीच्या वेळेवर आणि धाडसी कारवाईमुळे पाच खलाशांचा जीव वाचवता आला. समुद्राच्या प्रतिकूल परिस्थितीतही जवानांनी धाडसाने सर्व पाच खलाशांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. सध्या एक खलाशी बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे.
- यशवंत शिवडीकर, मुख्य अधिकारी व स्टाफ अधिकारी (इंटेलिजन्स), तटरक्षक अवस्थान, डहाणू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com