रस्त्‍ये कामांची आयुक्तांकडून पाहणी

रस्त्‍ये कामांची आयुक्तांकडून पाहणी

Published on

रस्ते कामांची आयुक्तांकडून पाहणी
नवी मुंबई, पनवेल महापालिका क्षेत्रातील कामांना वेग
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नवी मुंबई आणि पनवेल महापालिका हद्दीतील सर्वच रस्ते खराब झाले आहेत. त्यातच नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरणही रखडले. आता रस्त्याच्या दुरुस्तीसह डांबरीकरणाच्या कामांनी वेग घेतला आहे. या कामांचा दर्जा तपासण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मंगळवारी (ता. ११) पाहणी केली. दुसरीकडे पनवेलमध्येही रस्त्याच्या डांबरीकरणाने गती घेतली आहे.

पावसाने उघडीप घेतल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार अभियांत्रिकी विभागामार्फत रस्ते सुधारणा कामांना वेग देण्यात आला आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मंगळवारी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासह सीवूड्स परिसरातील रस्ते कामाची पूर्वसूचना न देता आकस्मिकरीत्या प्रत्यक्ष जागी पाहणी करून कामाची गुणवत्ता राखत कामे जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या वेळी शिंदे यांनी सीवूड्स परिसरातील सेक्टर ४६, ४८ व ५० या परिसरातील कामांची पाहणी करीत अस्फाल्टिंग कामाचे परीक्षण केले. यामध्ये रस्त्याच्या पृष्ठभागाचे व्यवस्थित पुनर्पृष्ठीकरण करण्यात यावे. प्रथमतः रस्त्याचे खड्डे व उतार दुरुस्ती आवश्यकतेनुसार बीएम थराने करून घ्यावी. डांबराचे थर टाकताना तापमान १२० डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी नको याची काळजी घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले. ही कामे आठ ते १० दिवसांत जलद पूर्ण करावीत तसेच त्या ठिकाणचे जलवाहिन्यांचे कामही तत्परतेने करण्यात यावे, असे निर्देश शिंदे यांनी अधिकाऱ्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यावेळी कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे उपस्थित होते.

कामांचा दर्जा तपासणार
शहरात वेगाने सुरू असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण केले जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित विभागाला परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या व होणाऱ्या तक्रारी व सूचनांनुसार सर्वच विभागांमध्ये रस्ते सुधारणा कामांना वेग द्यावा आणि कामे गुणवत्तापूर्ण होतील याकडे काटेकोर लक्ष द्यावे, असेही स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत अभियांत्रिकी विभागास देण्यात आले.


तळोजा फेज १ मधील रस्ते दुरुस्तीला वेग
पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या आदेशानंतर पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर, तळोजा, पाचनंद, तळोजा फेज-१, सेक्टर १०मधील खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्ती कामांना वेग आला आहे. सध्या पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागांतील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती कामे सुरू आहेत. अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, खराब रस्त्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी विभागनिहाय कनिष्ठ अभियंत्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com