महापालिकेचे वाहनतळ गॅरेज मालकांना आंदण
महापालिकेचा वाहनतळ गॅरेजमालकांना आंदण
वाशी, नेरूळमध्ये सामान्य वाहनचालकांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : सामान्य नागरिकांना रस्त्यावर वाहने उभे करता यावीत, याकरिता महापालिकेतर्फे रस्त्याच्या कडेला दुतर्फा वाहने उभी करण्याची सोय केली जाते. मात्र या जागांवर सध्या वाशी आणि नेरूळ भागातील गॅरेजमालकांनी संसार थाटला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यावर गॅरेजवाल्यांची चारचाकी वाहने उभी करून दुरुस्ती कामे केली जातात. परिणामी सामान्य नवी मुंबईकरांना स्वतःच्या वाहनांसाठी जागाच मिळत नाही.
दिघा ते बेलापूरपर्यंत महापालिकेच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी एक बाजू वाहनतळाकरिता महापालिकेने दिली आहे. शहरात सुमारे ४० पेक्षा अधिक जागांवर महापालिकेने अधिकृतरीत्या निविदा काढून वाहने उभी करण्याची सोय केली आहे. मात्र यापैकी वाशीमध्ये हॉटेल गोल्डन पंजाबसमोरील रस्ते गॅरेजमालकांना आंदण दिल्याचे चित्र आहे. या ठिकाणी किमान ५० पेक्षा अधिक चार आणि दुचाकी वाहनांची गॅरेज आहेत. एखादे नवीन वाहन आले की त्याला सीट कव्हर, नव्या लाईट अशी सजावटीची कामे या ठिकाणी केली जातात. महापालिकेच्या वाहनतळासमोर या गॅरेजमालकांनी दुकाने थाटली आहेत. या वाहनतळावर सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्वच वाहने गॅरेजमध्ये सजावटीचे काम करून घेण्यासाठी आलेली असतात. परिणामी या भागात रस्त्यावरील वाहनतळावर इतर गाड्यांसाठी जागाच शिल्लक राहत नसल्याने महापालिकेच्या हेतूला हरताळ फासला जात आहे. नेरूळ येथे डी. वाय. पाटील विद्यापीठासमोरील रस्त्यावर हीच अवस्था आहे. या ठिकाणी गॅरेजमालक, टायरवाले, वाहनांची सजावट करणाऱ्यांनी बस्तान मांडले आहे. महापालिकेच्या रस्त्यावरील वाहनतळाचा वापर करून लाखो रुपये कमावले जातात. मात्र अशी वाहने आणि गॅरेजमालकांवर महापालिका कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालताना दिसत आहे.
---------------------------------------
पाच महिन्यांनंतर महापालिकेला येणार अंदाज
सीबीडी बेलापूर सेक्टर १५ येथे महापालिकेने चारमजली वाहनतळ उभा केला आहे. हा वाहनतळ उभा करण्यापूर्वी महापालिकेने फिजिबल रिपोर्ट करून घेतला आहे. त्यानंतर कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने बहुमजली वाहनतळ उभा केला आहे. परंतु आता महापालिकेने हा वाहनतळ अवघ्या पाच महिन्यांकरिता अंदाज येण्यासाठी एका कंत्राटदाराला व्यवसायासाठी दिला आहे. महापालिकेला अंदाज नसल्यामुळे हा वाहनतळ दिला असल्याचे मालमत्ता विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे यांनी सांगितले.
-------------------------------------------
कंत्राटदार आणि गॅरेजमालकांना फायदा
नवी मुंबई महापालिकेतर्फे शहरात मोबिलिटी पॉलिसी प्रशासनातर्फे आखण्यात आली आहे. या धोरणाअंतर्गत अडथळेविरहित पदपथ आणि रस्ते देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. रस्ते आणि पदपथावर असणारे अतिक्रमण काढण्याची जबाबजारी महापालिकेची आहे. महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या वाहनतळाच्या निविदा आणि दर सामान्यांना परवडणारे असावेत, असा प्रशासनाचा कल आहे. परंतु महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे यांनी वाहनतळाचे दर कंत्राटदारांना परवडत नसल्याने जो मागेल त्याला देऊ असे धोरण आखले असल्याचे त्यांनी सांगितले.
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

