ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण कर्वे यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण कर्वे यांचे निधन
पालघर, ता. १२ (बातमीदार) : तलासरी येथील ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण दत्तात्रय कर्वे (वय ७८) यांचे बुधवारी (ता. १२) दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. तलासरी तालुक्यातील अनेक प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीतून वाचा फोडली, आदिवासी भागातील प्रश्नांना शासन दरबारी पोहोचविण्याचे काम त्यांनी केले, ‘सकाळ’मध्येही त्यांनी अनेक वर्षे काम केले होते. त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी, मुलगा, आणि विवाहित कन्या असा परिवार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करण्याचे कार्य त्यांनी अविरत केले. दहावीच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या मुलाला पेढे वाटण्यासाठी पैसे नसल्याने त्याने अनुभवलेले दुःख त्यांनी ‘सकाळ’मधून बातमी स्वरूपात मांडले होते. या बातमीमुळे त्या विद्यार्थ्याला राज्यभरातून मोठी शैक्षणिक मदत मिळाली होती. हे कर्वे यांच्या पत्रकारितेतील संवेदनशीलतेचे एक जिवंत उदाहरण आजही लोकांच्या स्मरणात आहे. आपल्या परखड लिखाणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या कर्वे यांना पत्रकारितेतील डॉ. नानासाहेब परुळेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यावर गुरुवारी (ता. १३) तलासरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

