आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना हेळसांड
टोकावडे पोलिसांची असंवेदनशीलता
पीडित कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात येण्याचे फर्मान
मुरबाड, ता. १२ (बातमीदार) : भातपिकाचे नुकसान व पत्नीच्या आजारपणामुळे जायगाव येथील शेतकरी रमेश गणपत देसले (वय ५२) यांनी बुधवारी (ता. ५) विषप्राशन केले होते. उपचारादरम्यान रविवारी (ता. ९) त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी टोकावडे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली, मात्र पोलिसांनी देसले कुटुंबीयांच्या घरी जाऊन जबाब घेण्याऐवजी पोलिस ठाण्यात जबाबासाठी येण्याचे फर्मान धाडले. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (ता. १२) कुटुंबीयांचे जबाब नोंदविले. पोलिसांच्या या असंवेदनशीलतेमुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सेक्युलर) ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी सांगितले की, टोकावडे पोलिसांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांचे जबाब घेणे गरजेचे होते; त्या ऐवजी दुःखात असलेल्या देसले यांच्या नातेवाइकांनाच पोलिस ठाण्यात बोलावून टोकावडे पोलिसांनी व प्रशासनाने शेतकऱ्याच्या प्रति असंवेदनशीलता दर्शविली आहे, याचा आम्ही निषेध करतो’ दुसरीकडे टोकावडे पोलिसांच्या वागणुकीमुळे पोलिसांची व प्रशासनाची शेतकऱ्यांबाबतची संवेदनशीलता हरवली असल्याची टीका परिसरातील नागरिकांनी केली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे. त्यातच शासनामार्फत अद्यापि आम्हाला कोणतीही मदतीची घोषणा करण्यात आली नसल्याची माहिती देसले कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, बुधवारी मुरबाडचे तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच आमदार किसन कथोरे यांनी पीडित देसले कुटुंबीयांची भेट घेतली.
पावसामुळे मुरबाड तालुक्यात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे नुकसान व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची मुरबाड तालुक्यातील ही पहिलीच घटना घडली आहे. याची दखल शासनाकडून घेण्यात यावी व शेतकऱ्याला तातडीने मदत करण्यात यावी.
- सुभाष घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

