मध्य रेल्वेकडून १४ विशेष गाड्या; विमानसेवेतील गोंधळात रेल्वेचा पुढाकार
मध्य रेल्वेकडून १४ विशेष गाड्या
विमानसेवेतील गोंधळात रेल्वेचा पुढाकार; प्रवाशांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा गेल्या चार दिवसांपासून सातत्याने विस्कळित झाल्याने मुंबईसह देशातील विविध विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने तातडीचा निर्णय घेत तब्बल १४ विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. या निर्णयामुळे अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
मुंबई, दिल्ली, गुजरात, बंगळूर यांसह प्रमुख विमानतळांवरील इंडिगोची उड्डाणे रद्द किंवा विलंबाने होत असल्याने अनेक प्रवासी कुटुंबासह अडचणीत सापडले आहेत. सुरक्षित आणि सुनिश्चित प्रवासाचा पर्याय देण्यासाठी भारतीय रेल्वेने देशभर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून, त्यात मध्य रेल्वेचा सक्रिय सहभाग आहे. मध्य रेल्वेच्या या विशेष गाड्या मडगाव, नागपूर, बंगळूर, लखनौ, गोरखपूर आणि हजरत निझामुद्दीन (दिल्ली) या प्रमुख ठिकाणांकरिता धावणार आहेत. या गाड्यांमधून प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि तुलनेने आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या विशेष गाड्यांमध्ये प्रथम वातानुकूलित, द्वितीय व तृतीय वातानुकूलित, शयनयान तसेच सामान्य द्वितीय वर्गाचा समावेश ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांपासून ते वातानुकूलित प्रवास करणाऱ्या प्रवाशांपर्यंत प्रत्येकाला पर्याय उपलब्ध झाला आहे.
---------------
गरजेनुसार आणखी गाड्या चालविण्यात येतील : मध्य रेल्वे
एलटीटी स्थानकावरून लखनौकरिता दुपारी १२.३० वाजता पहिली विशेष गाडी सोडण्यात आली. सीएसएमटी-हजरत निझामुद्दीन (दिल्ली) विशेष गाडी दुपारी ५.१५ वाजता रवाना झाली. त्याचबरोबर पुणे-बंगळूर आणि नागपूर-सीएसएमटी या विशेष गाड्याही शनिवारी धावल्या. रविवारी सीएसएमटी-नागपूर (दुपारी ३.३०), एलटीटी-मडगाव (सकाळी ११.१०), एलटीटी-हैद्राबाद (दुपारी ५.२०) आणि पुणे-हजरत निझामुद्दीन ही विशेष गाडी रात्री ८.२० वाजता सोडण्यात येणार आहे. प्रवाशांची गरज आणि प्रतिसाद लक्षात घेऊन आणखी विशेष गाड्या चालविण्यात येतील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. विमानसेवेतील गोंधळात रेल्वेचा हा पुढाकार प्रवाशांसाठी दिलासादायक ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

