बनावट तिकिटांवर लगाम; मध्य व पश्चिम रेल्वेची संयुक्त धडक मोहीम
बनावट तिकिटांवर लगाम
मध्य व पश्चिम रेल्वेची संयुक्त धडक मोहीम; दोषी आढळल्यास कारावासाची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : उपनगरी रेल्वेमधून बनावट, खोटी अथवा बनवाबनवी केलेली तिकिटे वापरून प्रवास करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांनी संयुक्तपणे कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. बनावट तिकिटांमुळे प्रामाणिक प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी तिकीट तपासणीची यंत्रणा आता अधिक कडक केली जाणार आहे.
दोन्ही रेल्वेमार्गांवरील स्थानके आणि लोकल गाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी पथके तैनात करण्यात येणार आहेत. या पथकांकडून अनियमित प्रवास, बनावट तिकिटांचा वापर तसेच पासमधील फेरफार यांची कसून तपासणी केली जाणार आहे. संशयास्पद प्रकरणांत तत्काळ कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासणी मोहिमेचा भाग म्हणून मासिक किंवा त्रैमासिक पासवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वैध ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य केले आहे. तिकीट तपासकाने विचारणा केल्यास ओळखपत्र दाखवावे लागेल. पासवरील नोंदवलेली माहिती आणि ओळखपत्रातील तपशील जुळणे बंधनकारक असेल, अन्यथा प्रवास अनियमित मानला जाऊ शकतो.
कारावासाची तरतूद
दरम्यान, बनावट तिकिटे तयार करणारे तसेच अशा तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अधिनियम, २०२३ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. फसवणूक व बनावटपणाशी संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात येतील. या गुन्ह्यांमध्ये दंड, कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांत सात वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांना आवाहन
प्रवाशांना कोणत्याही फसव्या मार्गाने तिकिटे खरेदी करू नयेत, असा कडक इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे. प्रवासासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून, रेल्वेस्थानकावरील तिकीट काउंटरमधून किंवा एटीव्हीएमद्वारे तिकीट घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी युटीएस ॲपचा वापर करण्याचाही सुरक्षित आणि सोपा पर्याय उपलब्ध आहे. नियमांचे पालन केल्यास प्रवास अधिक सुरळीत आणि सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त करत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ‘सन्मानाने प्रवास करा, सुरक्षित प्रवास करा’ हा संदेश दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

