बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी तीव्र

बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी तीव्र

Published on

बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी तीव्र
नागरिकांमध्ये तीव्र संताप
वाशी, ता. ७ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व नोडमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा बेकायदा खासगी वाहन पार्किंगचा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असून वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. नागरिक, पादचारी तसेच रुग्णवाहिका व स्कूलबसचालकांना अक्षरशः कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. पालिका रस्ते हे खासगी वाहनांना पार्किंगसाठी आंदण दिले आहेत का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
काही व्यावसायिकांनी स्वतःच्या दुकानासमोरील फलक हटवल्याचीही माहिती समोर आली आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे टी-जंक्शन परिसरात कायमच कोंडी दिसते. त्यामुळे वाहनचालक समांतर अंतर्गत रस्त्यांवरून ऐरोलीपर्यंतचा पर्यायी मार्ग पकडतात; मात्र या मार्गावरही दुतर्फा पार्किंगमुळे नेहमीच अडथळे निर्माण होतात.
वाशी सेक्टर ९, १०, १५, १६ तसेच कोपरखैरणे सेक्टर १९ आणि माथाडी वसाहतीतील अंतर्गत रस्त्यावर रोजच कोंडी होत आहे. अरुंद रस्ते आणि दुतर्फा उभी केलेली वाहने यामुळे अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि एनएमएमटीच्या बसना मार्ग काढताना मोठी समस्या भेडसावते. घणसोली, सानपाडा, पामबीच मार्ग, नेरूळ आणि सीबीडी बेलापूरमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. दोन मिनिटांचा मार्ग पार करण्यास १५ मिनिटांपर्यंत वेळ लागत असल्याची तक्रार वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईकरांकडून बेकायदा पार्किंगवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून वाहतूक पोलिस उपआयुक्त तिरुपती काकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही. दुतर्फा बेकायदा पार्किंगला आळा बसला तरच नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल, असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

चौकट
वाशीमध्ये नो-पार्किंग झोनमध्ये गाड्याच
वाशी विभागात बेकायदा पार्किंग मोठी डोकेदुखी बनली आहे. वाशी मर्चंट जिमखाना सेक्टर १४च्या समोरील नो-पार्किंग झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहन पार्किंग सुरू असून स्थानिक रहिवासी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे शहर सचिव विशाल भनगे यांनी वाहतूक पोलिस निरीक्षक सुनील कदम यांना लिखित निवेदन देऊन या पार्किंगविरोधात तत्काळ कारवाईची मागणी केली. गुरुवारी (ता. ४) दिलेल्या निवेदनात आपत्कालीन वाहनांना होणाऱ्या अडथळ्यांकडेही लक्ष वेधण्यात आले. भनगे यांच्यासोबत शुभम भोईर, अभिजित आग्रे, अनिरुद्ध मेंगडे, जयपाल पवार, शेखर राव व सुरेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com