अलिबाग-रोहा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

अलिबाग-रोहा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

Published on

अलिबाग-रोहा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त; आरोग्य आणि सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर
अलिबाग, ता. ७ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. अलिबाग-रोहा रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालकांसह प्रवासी त्रस्‍त झाले आहेत. या रस्त्यासाठी १७० कोटींचा निधी मंजूर असून, आतापर्यंत ६० कोटी खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे, मात्र रस्त्यावरून जाताना नागरिकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे.
स्वखर्चाने रस्ता तयार करून देईन, असे आश्वासन आमदार महेंद्र दळवी यांनी मागील निवडणुकीपूर्वी दिले होते, मात्र हे आश्वासन फेल ठरल्याचे बोलले जात आहे. अलिबाग-रोहा मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांतून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल, खड्ड्यांतून आणि आता धुळीतून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या रस्त्याचे काम अपुरेच असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. गेली अनेक महिने या रस्त्याचे काम रखडले होते. विद्यमान आमदार दळवी यांनी अनेक वेळा नारळफोडीचा कार्यक्रम राबविला, मात्र त्या रस्त्याच्या कामाला काही मुहूर्त मिळाला नाही. अखेर यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रस्त्याचे काम सुरू झाले, मात्र त्यावरूनही शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरू होता. शिवसेनेतील आणि पूर्वीचे भाजपचे दिलीप भोईर आणि आमदार दळवी यांच्यामध्ये घणाघाती वाकयुद्ध सुरू झाले होते. दरम्यान, वेलवली-खानाव, खानावपर्यंत काँक्रीटीकरण करण्यात आले. हॅममधून मंजूर होऊन अपूर्णावस्थेत असणारा अलिबाग-रोहा रस्ता आता खड्ड्यांमुळे जाम झाला आहे. खानाव ते सुडकोली हा प्रवास अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. खासकरून नांगरवाडी ते भागवाडीमधील खिंडीची अवस्था दयनीय झाली आहे. अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक वेळा एसटी बसेसदेखील या रस्त्यावर नादुरुस्त होत आहेत. यामुळे अलिबाग-सुडकोली मार्गावरील प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
.................
खड्डे, धूळ आणि अपघातांचा धोका
खानाव ते सुडकोली हा मार्ग अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला असून, खासकरून नांगरवाडी-भागवाडी परिसरातील खिंडीतील अवस्थेमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. अनेक एसटी बस या रस्त्यावर चालवताना नादुरुस्त होतात. त्यामुळे अलिबाग-सुडकोली मार्गावरील प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत.
..................
आरोग्याचा गंभीर प्रश्न
अत्याधिक उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना डोळ्यांचे आजार, त्वचेचा त्रास, तसेच श्वसनाचे विकार वाढल्याची तक्रार आहे. स्थानिक व्यावसायिक, दुकानदार, विद्यार्थ्यांचा यामुळे रोजचा त्रास वाढत असल्याचे दिसून येते. धुळीच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे दीर्घकालीन आरोग्यधोक्याची भीती व्यक्त केली जात आहे.
..........
प्रतिक्रिया :
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम सोमवारपासून सुरू केले जाणार आहे. मजबुतीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण या धर्तीवर हे काम केले जाणार आहे.
- एम. एम. धायतडक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com