वातानुकुलीत शौचालयांची वाताहात
वातानुकूलित शौचालयांची वाताहत
पालिकेच्या दंडाला केराची टोपली; मुदत संपूनही कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
ठाणे, ता. ७ ः शहरात जाहिरात हक्काच्या मोबदल्यात ३० वातानुकूलित शौचालये उभारण्याची महापालिकेची महत्त्वाकांक्षी योजना सपशेल फसली आहे. पालिकेने केलेल्या पाहणीत एकाही शौचालयात करारनाम्याप्रमाणे एसी लावण्यात आला नसल्याचे आणि स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय असल्याचे उघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, पालिकेने कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावूनही संबंधित ठेकेदाराने प्रशासनाच्या दंडाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिकेने आनंदनगर ते गायमुखपर्यंत मुख्य रस्त्यांवर ३० वातानुकूलित व सर्व सुविधांनी युक्त शौचालये उभारण्याची योजना आखली होती. ३० पैकी केवळ १७ ठिकाणीच स्वच्छतागृहे बांधण्यात आली. या १७ पैकी दोन स्वच्छतागृहे मेट्रोच्या कामामुळे बंद अवस्थेत आहेत. उर्वरित १५ शौचालयांमध्ये स्वच्छता बऱ्यापैकी असली तरी बांधकामाचा दर्जा निकृष्ट असून, अनेक ठिकाणी शौचालयांना गळती लागल्याचे पालिकेच्या पाहणीत दिसून आले. या योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब दैनिक ‘सकाळ’ने २५ नोव्हेंबरच्या वृत्तात उघडकीस आणली. काही ठिकाणी शौचालयाची एक वीटही न उभारता जाहिराती झळकत असल्याचे बाब दैनिक ‘सकाळ’ने उघडकीस आणली; पण आता या संदर्भाचा आणखीन एक मनमानी कारभार समोर आला आहे.
बिकट अवस्था
वातानुकूलित शौचालयांच्या तक्रारी वाढल्यानंतर ठाणे महापालिकेने चौकशी लावून या बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी ३० पैकी प्रत्यक्षात कोपरी आनंदनगर, फॉरेस्ट ऑफिस तीन हात नाका, टॅफिक ऑफिस, दीप ज्योती सोसायटी, कॅडबरी नाका, शिवाईनगर, बेथनी हॉस्पिटल, गांधीनगर पोखरण रोड, शांतीनगर, ब्रम्हांड नाका, मानपाडा, बाळकुम जकात नाका, माजिवडा, लोढा नाशिक हायवे, साकेत हायवे, कोर्टनाका आदी परिसरांमध्ये केवळ १७ स्वच्छतागृहे बांधल्याची धक्कादायक बाब समोर आली. या १७ पैकी दीप ज्योत सोसायटी आणि बाळकुम जकात नाका येथील स्वच्छतागृहे मेट्रो कामासाठी बंद अवस्थेत आढळून आली. उर्वरित १५ शौचालयांमध्ये स्वच्छता बऱ्यापैकी असली तरी त्याच्या बांधकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक शौचालयांना गळती लागली असून बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघडकीस आले आहे.
मुख्य अटीचाच भंग
मुळात वातानुकूलित शौचालय या शिर्षकालाच बगल देण्यात आल्याचे दिसून आले. कारण ब्रम्हांडनाका वगळता कोणत्याच शौचालयामध्ये एसी बसवण्यात आला नसल्याची बाब उघडकीस आली आली आहे. पालिकेच्या अहवालानुसार १७ पैकी १२ ठिकाणी एसी संच बसवण्यात आलेला नाही. चार ठिकाणचे एसी चालू-बंद अवस्थेत असतात. केवळ एकाच ठिकाणी एसी चालू असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे करारनाम्यातील मुख्य अटीचाच भंग झाला आहे.
दंडावर दंड
शौचालय बांधणे, स्वच्छता- देखभाल- दुरुस्ती करणे आणि वातानुकूलित संच बसवणे हे तीन प्रमुख अटी घालून त्या मोबदल्यात जाहिराती झळकवण्याचा अधिकार ठेकेदाराला देण्यात आला होता. या अटींचा भंग झाल्याने ठाणे महापालिकेने १६ शौचालयांच्या मोबदल्यात झळकलेल्या जाहिरातींच्या फीवर सुमारे दोन लाख ५३ हजार ४४० म्हणजे ३३ टक्के दंड या ठेकेदाराला ठोठावला होता. तसेच या शौचालयांची दुरुस्ती तीन महिन्यांत करण्याचे आदेश दिले होते. ही मुदत संपल्यावरही कोणतीच दखल ठेकेदाराने घेतली नाही. उलट जाहिरातबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे जुलैमध्ये पालिकेने पुन्हा नोटीस काढून जाहिरातबाजी अनधिकृत ठरवून एक कोटी ८२ लाख १३ हजारांची जाहिरात फी आणि दंड भरण्याची तंबी दिली. यासंदर्भाची नोटीस पालिकेने दोन वेळा संबंधित ठेकेदाराला दिली आहे; मात्र त्याकडेही ठेकेदाराने कानाडोळा केल्याचे दिसते.
ठेका रद्द करा
ठाणे महापालिकेने पाहणी करून वातानुकूलित शौचालयांची शोकांतिका आपल्या डोळ्याने पाहिली आहे. यासंदर्भात ठेकेदाराला दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली; पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पालिकेने सुमारे दोन कोटींच्या वसुलीची नोटीस दोन वेळा दिली, तरी त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. ठेकेदाराची इतकी मनमानी महापालिका प्रशासन का सहन करत आहे, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी उपस्थित केला आहे. तावडे हे या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून त्यांनी संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

