धावत्या एक्स्प्रेसमध्ये ऑपरेशन अवंतिका

धावत्या एक्स्प्रेसमध्ये ऑपरेशन अवंतिका

Published on

पाठलाग

धावत्या एक्स्प्रेसमध्ये ऑपरेशन अवंतिका


गणेश विसर्जनाच्या जल्लोषानंतर उल्हासनगराला हादरवणाऱ्या प्राणघातक हल्ल्याचा शेवट अगदी चित्रपटातील क्लायमॅक्सलाही लाजवेल असा ठरला. सराईत गुंड आणि त्याचे साथीदार उज्जैनवरून परतणाऱ्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये असल्याची गुप्त माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी सापळा रचला. बोरिवली स्थानकावर गाडीला वेढा घालून तिघा फरार आरोपीना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले.
=============

नवनीत बऱ्हाटे, उल्हासनगर
गणेश विसर्जनाचा जल्लोष ओसरत असताना उल्हासनगर कॅम्प–४ मधील संतोषनगर परिसरात रक्तरंजित घटना घडली. शिवसेना शाखेजवळ साईनाथ मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांवर अमल्या ऊर्फ अमोल सावंत, राहुल ठाकूर (बाबू), तुषार गोडांबे (गोट्या) व त्यांच्या साथीदारांनी चॉपर आणि काठ्यांनी अचानक प्राणघातक हल्ला केला. जुन्या वैमनस्यातून निर्माण झालेल्या या वादात हर्ष गायकवाड गंभीर जखमी झाला, तर फिर्यादी यश पांडे याने संपूर्ण घटनेची माहिती देत विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास जलदगतीने सुरू झाला. तुषार गोडांबे तत्काळ ताब्यात घेतले; परंतु मुख्य आरोपी अमोल, राहुल आणि करण हे तिघे फरार झाले. शहरात तणावपूर्ण वातावरण असतानाच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल लोकेशनचा आधार घेतला. गुप्त बातमीदारांच्या माहितीद्वारे महत्त्वाचा धागा शोधला. त्यावेळी फरार आरोपी उज्जैनवरून अवंतिका एक्स्प्रेसने परत येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता ‘ऑपरेशन अवंतिका’ची आखणी केली व धावत्या एक्स्प्रेसमधूनच आरोपींना पकडण्याचा निर्णय घेतला.

अवंतिका एक्स्प्रेस मुंबईकडे येत असताना पथक बोरिवली स्थानकावर अत्यंत गोपनीय पद्धतीने तैनात झाले. काही पोलिस साध्या वेशात गर्दीत मिसळले, काही फलाटाच्या टोकाला उभे राहिले तर काहींनी कोचनिहाय हालचालीवर लक्ष ठेवले. एक्स्प्रेसचा वेग मंदावताच पथकाने दरवाजाजवळ संशयास्पदपणे उभ्या तीन व्यक्तींवर नजर रोखली.

क्षणाचाही विलंब न लावता पोलिस उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे यांनी पहिले पाऊल टाकले आणि त्यांच्या मागोमाग पथकाने एक्स्प्रेसच्या दारावर धाव घेतली. अमोलने पळण्याचा प्रयत्न केला; पण रामदास मिसाळ आणि दिलीप चव्हाण यांनी त्याला क्षणात जमिनीवर दाबून ठेवले. दुसरीकडे राहुल ठाकूर गर्दीत मिसळण्याचा प्रयत्न करत असताना फलाटाच्या टोकाला आधीच तैनात असलेल्या संतोष सांगळे आणि गणेश राठोड यांनी त्याला गाठत अटक केली. तिसरा आरोपी करण वंशला चंद्रकांत गायकवाड आणि सागर मोरे यांनी पकडत "ऑपरेशन अवंतिका" पूर्ण केले.
फक्त काही सेकंदांच्या अचूक आणि धाडसी कारवाईत तिन्ही फरार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. विठ्ठलवाडी पोलिसांनी तिघांना घेऊन पुन्हा उल्हासनगर गाठले.

पोलिस पथकाची कारवाई
पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक निरीक्षक अमोल कोळी, वरिष्ठ निरीक्षक अशोक कोळी आणि निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक बी.आर. दराडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार झाले. या पथकात रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, गणेश राठोड, चंद्रकांत गायकवाड आणि सागर मोरे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com