ठाण्यात संगीत-नृत्याचा सुरेल जलवा

ठाण्यात संगीत-नृत्याचा सुरेल जलवा

Published on

ठाण्यात संगीत-नृत्याचा सुरेल जलवा
पं. राम मराठे महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे, ता. ७ (बातमीदार) ः ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची रंगत नृत्य, गायन व सितारवादनाच्या सुरेल मेळाव्याने अधिकच खुलली. रसिकांसाठी हा दिवस मंत्रमुग्ध करणारा ठरला.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात पद्मश्री पं. राजेंद्र गंगाणी यांच्या प्रभावी कथक नृत्याने झाली. भगवान गणेश वंदनेपासून प्रारंभ केलेल्या त्यांच्या सादरीकरणात एक ताल व तीन तालातील रचना, जयपूर घराण्याची गहनता आणि थाट नृत्याची लयबद्धता भरभरून जाणवली. गुरुवंदनेतील छोटा भजन आणि तलवारबाजीची अनोखी शैली यांना प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. रसिकांना आध्यात्मिक अनुभवाशी जोडणे हे माझे ध्येय, असे गंगाणी यांनी सांगितले. त्यांना तबला, हार्मोनियम, सारंगी व बासरीची उत्तम साथ लाभली.
यानंतर ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी राग पूर्व कल्याणातील बंदिशी, तराना आणि तीन तालातील मनोहारी सादरीकरणाने रसिकांना सुरांच्या प्रवाहात रंगवले. पं. राम मराठे यांच्या आठवणी जागवत त्यांनी त्यांच्या संगीत कल्पकतेचे कौतुक केले. रोहित देव (तबला) आणि सिद्धेश बिचोलकर (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. संध्याकाळी सुप्रसिद्ध सितारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांनी राग यमनमधील आलापाने वातावरण भारून टाकले. द्रुत गत ताना, नजाकत आणि एटावा-इमदादखानी घराण्याची परंपरा उजागर करणाऱ्या त्यांच्या वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. उन्मेष बॅनर्जी यांनी तबल्यावर साथ दिली. दरम्यान, महोत्सवातील लकी ड्रॉमध्ये श्रद्धा हर्डीकर व अशोक सरवटे यांची भाग्यवान प्रेक्षक म्हणून निवड करण्यात आली व त्यांना सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com