ठाण्यातही ''उत्तर गोवा अग्नितांडव'' दुर्घटनेची भीती
ठाण्यातही उत्तर गोवा अग्नितांडव दुर्घटनेची भीती
अवैध पब, लाउंज बार, हुक्का, हाॅटेल, रेस्टाॅरंट, डान्सबारवर कारवाई करा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ ः उत्तर गोव्यात गर्दीने भरलेल्या नाइट क्लबला शनिवारी (ता. ६) मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. डान्स फ्लोअरजवळ फोडलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागल्याचे प्राथमिकरीत्या केलेल्या चौकशीत समोर आले. ठाण्यातही विविध माॅल, वाणिज्य गृहसंकुल, मानपाडा येथील कोठारी कंपाउंड, हिरानंदानी इस्टेट, मेडोज, वागळे इस्टेट परिसरातील अवैध लॉज व हुक्का पार्लरमध्ये आणि हाॅटेल, रेस्टाॅरंट, डान्सबार याठिकाणी अग्निशमन दलाची कोणतीच परवानगी घेतली नसल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित आस्थापनांवर कारवाईची मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली.
उत्तर गोव्यात नियमांची अंमलबजावणी करण्यात सरकारी अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्याचेही समोर आले आहे. डान्स फ्लोअरवर नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आग लागल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. तेव्हा किमान १०० लोक डान्स फ्लोअरवर होते आणि आगीतून वाचण्याच्या प्रयत्नात, त्यापैकी काही जण खाली स्वयंपाकघरात पळून गेले. तिथे ते कर्मचाऱ्यांसह अडकले. आगीचा भडका उडाल्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले. अनेक जण तळमजल्यावर आणि स्वयंपाकघरात अडकले होते. विशेष म्हणजे, याठिकाणी एका तात्पुरत्या बांधकामाने सहज पेट घेतल्याने आग पसरत गेली आणि काही वेळातच संपूर्ण क्लब आगीत खाक झाला, त्यामुळे मृतांचा आकडा वाढला.
ठाण्यात पालिका प्रशासन, अग्निशमन दल, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क खात्यासह पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमतपूर्वक हेतूमुळे अशा आस्थापनांमध्ये अग्नितांडव होण्याची भीती आहे. या परिसरात अवैधरीत्या होणाऱ्या तात्पुरत्या बांधकामाने गोवा अग्निकल्लोळ दुर्घटनेची पुनरावृत्ती निश्चितच होऊ शकते. हे प्रकार सुसंस्कृत ठाणे शहरात टाळण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई आवश्यक असल्याचे मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रात नमूद केले.
नववर्ष स्वागत पार्ट्यांवर सावट
येत्या काळात नववर्ष स्वागतादरम्यान होणाऱ्या पार्ट्यांमध्ये असे अग्नितांडव घडण्याची शक्यता असून सतर्कता बाळगत तत्काळ या आस्थापनांवर कारवाई करावी. अन्यथा, मनसेस्टाइलने याठिकाणी तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यामुळे याठिकाणी कायदेशीर कारवाई करण्याची विनंती जाधव यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

