विरारमध्ये दिव्यांगस्नेही विशेष उद्यान उभारणार

विरारमध्ये दिव्यांगस्नेही विशेष उद्यान उभारणार

Published on

विरार, ता. ९ (बातमीदार) : सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींनाही उद्यानात विरंगुळा घेता यावा, यासाठी विरारमध्ये दिव्यांगस्नेही उद्यान तयार करण्यात येणार आहे. यासाठी विरार पश्चिमेच्या भागात महापालिकेने अडीच एकर जागा निश्चित केली असून, यासाठी सुमारे सात कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील हे पहिलेच उद्यान असणार आहे.

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत सध्या चार हजार ४९५ दिव्यांग नागरिकांची नोंद आहे. त्यांच्यासाठी महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत १३ प्रमुख योजना पुरविल्या जातात. या योजनांतर्गत अंध, अस्थिव्यंग, बहुविकलांग, कर्णबधिर-मूकबधिर दिव्यांग व्यक्तींना अनुदाने दिली जातात. या लाभाच्या बरोबर दिव्यांग व्यक्तींना समाजात मिसळण्याची संधी देणे, त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनविणे, सहानुभूतीऐवजी अनुभूती देणारे वातावरण तयार करणे, या उद्देशाने महापालिकेकडून शहरात विशेष उद्यान उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एका बाजूला महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयामध्ये जाण्यासाठी उद्वाहकाच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, मात्र आता पालिका प्रशासन त्यांच्या मानसिक विकासाच्या दृष्टीने प्रसन्न झाले आहे, असे चित्र आहे. विरार पश्चिमेतील मिडटाऊन परिसरात हे उद्यान उभारले जाणार आहे. या उद्यानासाठी पालिकेची अडीच एकर जागा निश्चित करण्यात आली असून, यासाठी सात कोटी निधी खर्च करण्यात येणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया ही सुरू केली असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

अशा असतील सुविधा...
वसई-विरारमध्ये पहिल्यांदाच उभारण्यात येणारे दिव्यांग उद्यान हे विशेष सुविधांयुक्त असणार आहे. या उद्यानात सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उपयुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी सोयीस्कर खेळणी आणि इतर उपकरणे, आवाजवर आधारित खेळणी, ब्रेल लिपीवर आधारित उपकरणे, वाचनालय, योग प्रशिक्षण केंद्र, स्वच्छतागृहे, मार्गदर्शन केंद्र अशा विविध शैक्षणिक आणि उपचारात्मक सुविधांचा समावेश असणार आहे.

नागरपूरमध्ये दिव्यांगांसाठी उद्यान उभारण्यात आले आहे, त्याच धर्तीवर वसई-विरार शहरातील दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उद्यान उभारण्यात येणार आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच निविदा प्रक्रिया पार पडणार आहे.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त, वसई-विरार महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com