टिटवाळ्यात साकारणार  ‘मियावाकी’ जंगल

टिटवाळ्यात साकारणार ‘मियावाकी’ जंगल

Published on

टिटवाळ्यात साकारणार ‘मियावाकी’ जंगल
३० हजार झाडांच्या लागवड कार्यक्रमाचे उद्‍घाटन
टिटवाळा, ता. ९ (वार्ताहर) : वाढत्या नागरीकरणात हरित पट्टे कमी होऊ लागले असतानाच टिटवाळा शहरात हिरवाईसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. टिटवाळा पूर्व येथील इंदिरानगर स्मशानभूमी परिसर आता दाट, समृद्ध आणि स्वयंपूर्ण हरित जंगलाने बहरणार आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी त्यांच्या सीएसआर निधीतून सावली या संस्थेच्या योगदानातून मियावाकी पद्धतीने तब्बल ३० हजार झाडांची घनदाट लागवड करण्याचा व पर्यावरण संवर्धनाचा शाश्वत संकल्प केला आहे.
इंदिरानगर स्मशानभूमी परिसर अनेक वर्षांपासून मोकळ्या अवस्थेत होता, परंतु आता स्मार्ट सिटी संकल्पनेला साजेशी हरित क्रांती टिटवाळ्यात पाहायला मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचे उद्‍घाटन मंगळवारी (ता. ९) पार पडले. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते हा उद्‍घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, बीपीसीएलचे वरिष्ठ अधिकारी आणि परिसरातील विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील प्रत्येक रोपट्याची पुढील तीन वर्षे निगा राखण्याची जबाबदारी बीपसीएल स्वतः स्वीकारत असून, झाडे जगविण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत या वृक्षलागवड जनजागृती रॅलीत सहभाग घेतला होता. जंगल बचाव, निसर्ग वाचवा, झाडे लावा हा संदेश देणारे फलक हातात घेऊन डोक्यावर रोपांची कुंडी घेऊन कार्यक्रमात निसर्ग संवर्धनाचा मोलाचा संदेश दिला. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गोयल म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व विद्यार्थांनी एक एक झाड लावण्याची शपथ घेऊन निसर्ग संवर्धनासाठी आपले योगदान दिले पाहिजे, तसेच निसर्गाचे जतन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून आपल्या प्रत्येक नागरिकाचीदेखील आहे.

विकासपर्वाला पर्यावरणपूरक दिशा
हवामान बदल, वाढते वायुप्रदूषण आणि सतत घटणारी हरित साधने या सर्वांच्या पार्श्वभूमीवर अशी हिरवाई टिटवाळ्यासाठी दिलासादायक ठरणार आहे. शहरातील तापमानवाढ रोखणे, धूळ-धूर कमी करणे, पक्षी आणि जैवविविधतेचे संवर्धन करणे यासोबतच नागरिकांसाठी हा परिसर संजीवनी ठरणार आहे. टिटवाळ्याच्या विकासपर्वाला पर्यावरणपूरक दिशा देणारा हा उपक्रम भविष्यात शहराच्या सौंदर्यामध्येही भर घालणार असून, पुढील पिढीला हा जतन केलेला निसर्गाचा वारसा मोलाचा ठरणार आहे.

मियावाकी जंगल म्हणजे काय?
मियावाकी ही झपाट्याने दाट जंगल उभारण्याची एक जपानी पद्धत आहे. डॉ. अकीरा मियावाकी या जपानी वनशास्त्रज्ञाने ही पद्धत विकसित केली. यामध्ये स्थानिक आणि नैसर्गिक वृक्षप्रजातींची निवड केली जाते. अतिशय कमी जागेत जास्तीत-जास्त झाडे खूप दाट पद्धतीने लावली जातात. पहिल्या दोन-तीन वर्षे झाडांची काळजी घेतली जाते. त्यानंतर ही झाडे स्वतः नैसर्गिकरीत्या वाढतात व संपूर्ण जंगल तयार होते.

मियावाकी जंगलाची वैशिष्ट्ये
लवकर वाढ ः साधारण २०-३० वर्षांत संपूर्ण नैसर्गिक जंगल तयार होते.
घनदाट हरित वातावरण ः जागा कमी लागते, पण झाडे जास्त वाढतात.
जैवविविधता वाढते ः पक्षी, फुलपाखरे, छोटे प्राणी यांचे आश्रयस्थान होते.
हवामान सुधारते ः प्रदूषण कमी होण्यास मदत, ऑक्सिजन वाढ.
पाण्याची धारण क्षमता वाढते ः जमिनीची सुपीकता सुधारते.

कुठे उपयुक्त?
* शहरांमध्ये
* रिकामी / ओसाड जमीन
* औद्योगिक परिसर
* स्मशानभूमी, शाळा, बागा इ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com