जाहिरात कंपनीचे काम निकृष्ट
सुशोभीकरण प्रकल्पचे काम निकृष्ट
जाहिरात कंपनीला पालिकेचा दणका; मुदतवाढीस नकार, नव्या निविदांची प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ठाणे पालिकेच्या माध्यमातून चौक सुशोभीकरणाचे काम जाहिरात कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीच्या माध्यमातून शहरातील ५० चौकांचे सुशोभीकरण करण्यात येत होते, मात्र उद्यान विभागाने केलेल्या पाहणीत या सुशोभीकरणात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. अशातच कंपनीने मुदत संपल्यानंतर आणखी पाच वर्षांसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी पालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला, मात्र आयुक्तांनीदेखील त्यांच्या प्रस्तावाला बाजूला करीत, नव्याने निविदा काढण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
ठाणे शहरातील प्रमुख ५० चौक आणि उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागांचे सुशोभीकरण करण्याची जबाबदारी एका जाहिरात कंपनीकडे सोपवण्यात आली होती. २०१६-१७ दरम्यान सुरू झालेल्या या प्रकल्पाची स्थिती मात्र समाधानकारक नसल्याचे महापालिका प्रशासनाच्या पाहणीत उघड झाले आहे. उद्यान विभागानेही या कंपनीच्या कामावर नाराजी व्यक्त करत मोठ्या प्रमाणात त्रुटी नोंदवल्या आहेत.
काम अपूर्ण
१० वर्षांच्या कालावधीसाठी या कंपनीला सुशोभीकरणाचे काम दिले होते. डिसेंबर २०२६ मध्ये विद्यमान कराराची मुदत संपत आहे. या काळात कंपनीला जाहिरातीचे आवश्यक हक्क मिळाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. याशिवाय कंपनीला दिलेली ठिकाणे शहरातील मुख्य रस्त्यांवरील आणि मोक्याच्या ठिकाणी आहेत. तरीही सुशोभीकरणाचे काम दर्जाहीन आणि अपूर्ण असल्याचे उद्यान विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे.
कंपनी म्हणते...
दुसरीकडे, या कंपनीने महापालिकेला पत्र लिहून दावा केला आहे की, मंजूर जाहिरात क्षेत्रफळ पूर्णपणे उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कराराची मुदत आणखी पाच वर्षांनी वाढवून द्यावी, अशी विनंती कंपनीने केली होती, मात्र महापालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव थेट फेटाळून लावत नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
उद्यान विभागाला आढळलेल्या प्रमुख त्रुटी
- अनेक ठिकाणी लाल माती व खताचा पुरवठा करण्यात आलेला नाही.
- शोभिवंत झाडांची लागवड केलेली नाही.
- स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- काही भाग अद्याप अविकसित स्थितीत.
- उड्डाणपुलाखालील दुभाजकांची दुरवस्था.
- रंगकाम, गॅप फिलिंग, गवत काढणे यांसारखी कामे अपूर्ण.
- काही चौक अस्तित्वात नसल्यासारखी अवस्था.
- आवश्यक स्थापत्य कामे व विद्युत दिव्यांची उभारणी अपुरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

