
जैन समाजाचे कार्य विसरणे अशक्य - शरद पवार
जैन समाजाचे कार्य विसरणे अशक्य - शरद पवार पुणे, ता. ७ : ‘‘भगवान महावीर यांनी दिलेले शांती व क्षमा हे तत्त्वज्ञान फक्त देशातच नाही, तर विदेशात सुद्धा स्विकारले गेले याचा गर्व आहे. देशात जेव्हा संकट निर्माण होते, तेव्हा जैन समुदाय समाजाच्या मदतीसाठी धावून जातो. देशासाठी जैन समाजाने केलेले काम आम्ही कधीही विसरू शकत नाही,’’ असे गौरोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले. जितो कनेक्ट परिषदेत शरद पवार यांच्या हस्ते ’प्राईड आॅफ पुणे’ पुरस्कार उद्योजक विजय भंडारी, सुधीर मेहता, युवा उद्योजक अतुल चोरडिया, सुर्यदत्ता इंस्टिट्यूटचे संस्थापक संजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्त्या विमल बाफना, संजय नहार, अॅथलेटिक्स खेळाडू प्रियम तातेड यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘जितो कनेक्ट २०२२‘ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. मुख्य प्रायोजक विनोद मांडोत, जीतो अॅपेक्सचे अध्यक्ष गणपतराज चौधरी, जीतो अॅपेक्सचे अध्यक्ष सुरेश मुथा, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, जीतो कनेक्टचे समन्वयक राजेश सांकला, रोम झोनचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, रोम जेएटीएफचे अध्यक्ष इंदर जैन, प्रकाश धारिवाल, रवींद्र दगड, अजय मेहता, पंकज कर्नावट, चेतन भंडारी, संचालक इंदर छाजेड, रमेश गांधी, अॅड. एस. के. जैन, विजयकांत कोठारी, देवीचंद जैन आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, ‘ देशात माझे अनेक जैन मित्र आहेत, त्यांनी देशासाठी मोठे काम केले आहे. यामध्ये भवरलाल जैन यांनी शेतीसाठी नवे तंत्रज्ञान आणले. पूर्वी बिर्ला, टाटा यांचेच देशात नाव घेतले जात होते. आता माझे मित्र गौतम अडाणी हे देशाला पुढे घेऊन जात आहेत. विमानसेवा, परदेशात आयात निर्यात, पायाभूत सुविधा या क्षेत्रात काम करत आहेत. जैन समाजातील नवी पिढी प्रशासकीय सेवेत, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रात मोठ्या पदावर काम करत आहेत. पण त्याच सोबत ’देशाच्या प्रगतीसाठी व्यापार-व्यवसायाकडेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’ याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. जैन समाजात चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार केला, पण त्यामध्ये संजय नहार यांचाही सत्कार केला याचाही आनंद वाटला. कश्मीरी मुलांना पुण्यात आणून शिक्षण दिले. सरहद्द, वंदेमातरम्संघटनेच्या माध्यमातून देशाच्या एकतेसाठी नहार यांनी केलेले काम महत्वाचे आहे, असेही शरद पवार म्हणाले. यावेळी पुरस्कार विजेत्यांच्या वतीने विजय भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योजक रवींद्र दुगड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राजेश सांकला यांनी पुरस्कार विजेत्यांची ओळख करून दिली. चौकट बाजारपेठ स्थलांतर करण्यास केला होता विरोध पुण्यातील मुख्य बाजारपेठ नाना पेठेत होते. पण तेथील जागा अपुरी पडत असल्याने ही बाजारपेठ गुलटेकडी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी व्यापार्यांनी विरोध करून १० दिवस बाजारपेठ बंद ठेवली होती. त्यावेळी ज्येष्ठ व्यापार्यांना सोबत घेऊन चर्चा करून समजून काढली. मार्केट यार्ड बाजारपेठ स्थलांतरित झाल्यानंतर पुढील पाच सहा वर्षात येथील व्यवसायात प्रगती झाली, व्यापार्यांनी जमीन घेऊन घरे बांधली. तुमची प्रगती झाली, आयुष्यात खुषी आली याचा मला आनंद आहे. आता याच बाजारपेठेच्या भागात जितोची परिषद होत आहे, अशा शब्दात आठवणींना पवार यांनी उजाळा दिला. फोटो ओळ गुलटेकडी, पुणे : जितो कनेक्ट परिषदेत शरद पवार यांच्या हस्ते ’प्राईड ऑफ पुणे’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी (डावीकडून) विमल बाफणा, सुधीर मेहता, प्रियम तातेड, विजय भंडारी, पवार, गणपतराज चौधरी, संजय चोरडिया, विठ्ठल मणियार, संजय नहार, अतुल चोरडिया.
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12769 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..