सातत्याने सकस वाचन करणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातत्याने सकस वाचन करणे गरजेचे
सातत्याने सकस वाचन करणे गरजेचे

सातत्याने सकस वाचन करणे गरजेचे

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : ‘‘सातत्याने सकस वाचन कले व वाचलेले अमलात आणले तरच वाचाल,’’ असे प्रतिपादन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी आज येथे केले.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचक प्रेरणा दिन समारंभात ते बोलत होते. कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम झाला. कॉसमॉस बँक व ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनतर्फे आयोजित समारंभात कवडे म्हणाले, ‘‘सध्या गॅजेटचा प्रभाव प्रचंड वाढला असल्यामुळे विज्ञान हा शापच वाटू लागला आहे. आपण समाजाचे घटक आहोत, याचे भान ठेवून सर्वांशी चांगले संबंध ठेवणे, दुसऱ्यास मदत करणे, नियम पाळणे या गोष्टी आवर्जून आचरणात आणल्या पाहिजेत. सामाजिक दायित्व हा सहकार क्षेत्रासाठीही महत्त्वाचा घटक आहे.’’

बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे म्हणाले, ‘‘प्रत्येक पुस्तकामागे विचार, स्फुरण आणि मांडणी हे महत्त्वाचे घटक असतात. जीवनात अनेक गोष्टींना प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे प्राधान्य या विषयावर विचार करायला लावणारे पुस्तक लिहावे असे मला वाटते.’’ या समारंभास लेखक किरण यज्ञोपवित उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘सध्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आहे. कला सादर करणारा व पाहणारा, यामध्ये मार्केट हा घटक महत्त्वाचा ठरला आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी वाचन हा सोपा उपाय आहे. समाधान आणि शांती मिळवण्यासाठी वाचन आवश्यक आहे. ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनचे गौतम कोतवाल यांनी वाचन संस्कृती वाढावी, हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. याप्रसंगी बँकेतील व इतर क्षेत्रांतील लेखकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मनीषा सबनीस आणि प्रियांका सुमंत यांनी सूत्रसंचालन केले.