
उत्कृष्ट शिल्पकला असलेले गुळसुंदेचे श्री सिद्धेश्वरी मंदिर
प्राचीन शिल्पकलेने नटलेले
गुळसुंदेचे श्री सिद्धेश्वरी मंदिर
निसर्ग सौंदर्य लाभलेल्या दांड-पेण रस्त्यावरील गुळसुंदे गावात पाताळगंगा नदीच्या तीरावर शिवमंदिर आहे. म्हणजेच श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. हे मंदिर पेशवेकालीन असून प्राचीन शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. येणारे भाविक येथील या शिल्पकलेत हरवून जातात. विष्णू आणि शंकराची मूर्ती एकाच मंदिरात असल्यामुळे या मंदिराला एक वेगळे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे.
हेमांडपंथी वास्तुशास्त्राच्या प्रकारात मोडणाऱ्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर काळ्या पाषाणावरील कोरीव कलाकुसर भाविकांचे लक्ष वेधून घेते. येथील शिल्पकला पेशवेकालीन असल्याने सर्वांना त्या आकर्षित वाटतात. सभामंडपात प्रवेश केल्यावर शंकराचे वाहन असलेला पाषाणाने घडवलेला नंदी आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळील उजव्या बाजूस श्री विष्णूची; तर डाव्या बाजूस श्री गणेशाची मूर्ती आहे. भव्य पाषाणात घडीव काम केलेल्या शंकराच्या पिंडीवर बांधलेल्या जलपात्रातून अभिषेक होत असतो. पौर्णिमेच्या स्वच्छ प्रकाशात संध्याकाळी पेटवलेल्या दीपमाळेचे विलोभनीय दृश्य येथे पाहायला मिळणे ही पर्वणी मानली जाते. या मंदिरात पार्वतीचीही मूर्ती आहे. मंदिराच्या मागील भागात असलेल्या पार्वतीच्या मूर्तीजवळ छिद्रावर डोळा ठेवून बघितले, तर सभामंडपातील नंदीच्या दोन शिंगांमधून दीपमाळेच्या टोकावरील काही दिवे अगदी स्पष्ट दिसतात. हे दृश्य पाहताना निळसर आकाश आणि चंद्रप्रकाश जणू काही दुर्बिणीतून पाहत आहोत, असे वाटते.
मंदिराच्या बाजूला १७५१ मधील श्री लक्ष्मी नारायणाचे मंदिर आहे. त्याच्याच बाजूला श्री रामदास स्वामींनी स्थापन केलेले श्रीराम व मारुतीचे मंदिर आहे. येथील ग्रामस्थांची विश्वस्त संस्था वर्गणीतून वर्षभरातील उत्सव, सोहळे कार्यक्रमांचे आयोजन करतात. तसेच डागडुजीची कामेही करत असतात. तसेच राजस्थानी कारागिरांनी १४ नोव्हेंबर, ६ ते ३१ डिसेंबर या दरम्यान मंदिराच्या मुळ ढाच्याला धक्का न लावता २००८ मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला आहे.
चित्रीकरणासाठी प्रसिद्ध
पाताळगंगा नदीच्या तीरावर आमराईतील पुरातन हे मंदिर, मंदिरासमोरून संथ वाहत जाणारी पाताळगंगा नदी या ठिकाणच्या विलोभनीय दृश्यामुळे हे ठिकाण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी प्रसिद्ध आहे.
- लक्ष्मण डुबे, रसायनी
Web Title: Todays Latest Marathi News Rsn22b02691 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..