मिरचीचा ठसका झोंबणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरचीचा ठसका झोंबणार
मिरचीचा ठसका झोंबणार

मिरचीचा ठसका झोंबणार

sakal_logo
By

रसायनी, ता. ८ (बातमीदार) ः प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकात गरजेच्या असणाऱ्या मिरचीचे भाव वाढले आहेत. त्‍यामुळे मिरचीचा ठसला गृहिणींच्या डोळ्यातून पाणी आणत असल्‍याचे चित्र आहे. वासांबे-मोहोपाड्यातील बाजारपेठेत गेल्‍या १०-१५ दिवसात मिरचीच्या भावात जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. सध्या मिरची प्रतिकिलो १२० रुपये दराने उपलब्‍ध आहे. आवक कमी झाल्‍याने दर वाढल्‍याचे विक्रेत्‍यांचे म्‍हणणे आहे.
पंधरा दिवसापूर्वी हिरव्या मिरचीचे दर हे ४० ते ५० रुपये किलो होते. पण हे भाव आता सुमारे १२० रुपयांच्या घरात गेले आहेत. याशिवाय मटार, सिमला मिरची, फ्लॉवर, घेवडा, गवार, शेवगा आदींचेही दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. गॅस, पेट्रोलबरोबरच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्‍याने ऐन सणासुदीत सर्वसामान्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. मिळकत तुटपुंजी आणि खर्च अनेक अशी अवस्‍था मध्यमवर्गीयांची झाली आहे. त्‍यात दैनंदिन जेवणाचा भाग असलेल्‍या भाज्‍या, मिरचीही महागल्‍याने ग्राहकांचा संताप होत आहे.
सध्या राज्‍यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्‍या परतीच्या पावसामुळे भाजीपाल्‍याचे नुकसान होत आहे. आवक कमी झाल्‍याने दर वाढल्‍याचे भाजी विक्रेते भगवान गुप्ता यांनी सांगितले.

मिरची स्वयंपाकासाठी अत्यावश्यक आहे. मिरची तसेच काही भाज्यांचे दर वाढले आहेत. महाग झालेल्या भाज्या वगळून स्‍वस्‍त दरातील भाज्यांचा जेवणात वापर करू शकतो. मात्र मिरचीच्या बाबत तसे करता येत नाही. त्यामुळे भाव वाढले तरी मिरची विकत घ्‍यावीच लागत असल्‍याचे सुजाता पाटील यांनी सांगितले.