रेलिंग तुटल्‍याने पुलावरील वाहतूक धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेलिंग तुटल्‍याने पुलावरील वाहतूक धोकादायक
रेलिंग तुटल्‍याने पुलावरील वाहतूक धोकादायक

रेलिंग तुटल्‍याने पुलावरील वाहतूक धोकादायक

sakal_logo
By

रसायनी, ता. ५ (बातमीदार) : वडगाव ग्रामपंचायतीत असलेल्‍या वाशिवली येथे पाताळगंगा नदीवरील पुलाचे लोखंडी रेलिंग तुटले आहेत. त्‍यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी पुलावरील प्रवास धोकादायक बनला असून रेलिंगची लवकरात लवकर दुरुस्‍ती करण्याची मागणी स्‍थानिकांकडून करण्यात येत आहे.
पाताळगंगा नदीवर बांधलेला वाशिवली आणि वयाळ गावाला जोडणाऱ्‍‌या पुलामुळे वडगाव पंचक्रोशीतील गावे लोधीवली व पनवेलला जोडली गेली आहेत. त्‍यामुळे पुलावर कायम वर्दळ असते. सुरक्षेसाठी पुलावर दोन्ही बाजूने लोखंडी रेलिंग लावले होते. त्‍यातील आडवे पाईप गायब झाले आहेत. अतिवृष्‍टीमुळे रेलिंग पुरात वाहून गेले असावे, अथवा चोरीला गेले असण्याची शक्‍यता नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
पुलावरून वाहनांची वयाळ, लोधीवलीकडे कायम रहदारी सुरू असते. याशिवाय वाशिवली येथे डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय आणि कनिष्‍ठ महाविद्यालयात वयाळ, टेभरी, आदिवासी वाडीतील विद्यार्थी, तसेच नागरिक कामानिमित्त वाशिवलीत तसेच रसायनी, पनवेलकडे जाण्यासाठी पुलाचा उपयोग करतात.
नदीवरील पुलाचे बहुतांश संरक्षण कठडे तुटल्‍याने रात्रीच्या वेळी अथवा भरधाव वाहन नदीत कोसळून अपघाताची शक्‍यता आहे. दर वर्षी पावसाळ्यात पुलावरून पुराचे जात; तर कधी-कधी अचानक नदीची पातळी वाढते, अशा वेळी संरक्षण कठड्याचा मोठा आधार असतो. त्‍यामुळे पुलाच्या रेलिंगची लवकरात लवकर दुरुस्‍ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सदर रस्ता जिल्हा परिषदकडे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यातबाबत मंत्रालयात प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर पुलाच्या दुरुस्तीच्या काम करण्याबाबत प्रयत्न केले जातील.
- प्रशांत राखाडे, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, खालापूर

पुलावर वाहनांची, पादचाऱ्‍‌यांची कायम वर्दळ असते. संरक्षणासाठी असलेले लोखंडी रेलिंग गायब आहेत, तर काही ठिकाणी तुटले आहेत. त्यामुळे पुलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. रेलिंग तसेच पुलावर पडलेले खड्डे बुजवण्यात यावेत.
- योगेश पाटील, वाशिवली, सामाजिक कार्यकर्ता

रसायनी ः वाशिवलीत पाताळगंगा नदीवरील पुलाचे रेलिंग तुटले आहे.