काळ्या शराटी रुसल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळ्या शराटी रुसल्या
काळ्या शराटी रुसल्या

काळ्या शराटी रुसल्या

sakal_logo
By

लक्ष्मण डुबे, रसायनी
रसायनी पाताळगंगा परिसरात छोटे-मोठे कारखाने आहेत. तर दुसऱ्या बाजूला पाताळगंगा नदीचा विस्तीर्ण किनारा आहे. परिसराला लागूनच कर्नाळा किल्ला आणि बाजूला माणिक गडाच्या डोंगररांगा आहे. याशिवाय परिसरात बारा महिने शेती व्यवसाय सुरू असतो. अशा अनुकूल वातावरणामुळे परिसरात पक्ष्यांची रेलचेल नेहमी असते. या वर्षी मात्र काळ्या शराटी पाहुण्या पक्ष्याची संख्या घटल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

परिसरात शेतकऱ्यांना पाताळगंगा नदी, धरण आदी सिंचन साधनाचा आधार असल्याने १२ महिने शेती व्यवसाय सुरू असतो. नदीकिनारी, शेतात, झाडांवर आदी ठिकाणी पक्ष्यांना खाद्य मिळत असते. पक्ष्यांसाठी अनुकूल वातावरण असल्याने देशी पक्ष्यांबरोबरच परदेशी पाहुणे पक्षी येत असल्याचे पक्षीप्रेमी सांगतात. पक्ष्यांसाठी परिसर नंदनवन झाला आहे. कबुतरे, कावळे, पाणकावळे, बगळे, पारव, चिमण्या, चिरक, साळुंख्या, पोपट, ठिपक्याचा पिंगळा आदी पक्षी परिसरात आढळतात. तसेच नीलकंठ, स्वर्गीय नर्तक, हिरवे कबुतरे, नाचण, कस्तुरी, हुदहुद, राखाडी धनेश, काळे शराटी, कृष्ण थिरथिरा, मोरकंठी लिटकुरी आदी स्थलांतरित पक्षीही परिसरात येत असतात, असे पक्षीप्रेमींनी सांगितले.
वासांबे मोहोपाडा परिसरात काळ्या शराटी पक्ष्यांचा थवा घिरट्या घालताना, झाडांवर किंवा शेतात, चिखलात कीडे टिपताना दिसतो. काही वर्षांपासून या काळ्या शराटीची संख्या कमी होताना दिसत आहे. मागील वर्षापेक्षा यंदा निम्म्या पक्ष्यांचा थवा दिसतो. या वर्षी शराटींची संख्या कमी आहे, असे खंडु धुरव, वामन दळवी या शेतकऱ्यांनी सांगितले.


एचओसी कॉलनीतील श्री साईबाबा मंदिराजवळील व इतर ठिकाणचे मोठ-मोठ्या झाडांवर पक्ष्यांचे वास्तव्य आहे. ऋतू बदलानुसार रसायनीत आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी नोव्हेंबरपासून सुंदर पाहुणे पक्षी सहा महिन्यांसाठी वास्तव्यास येतात. त्यानंतर एप्रिल, मेमध्ये परत जातात.
- विनायक डुकरे, पक्षीप्रेमी, रसायनी

शराटीचे वैशिष्ट्ये
काळ्या शराटी पक्षी दक्षिण आशियात आढळतात. भारताच्या मुख्य भूमीत, कोरड्या हवामानाच्या प्रदेशात हा पक्षी सर्वत्र आढळून येतो. बांगलादेशमध्ये याची वेगळी उपजात आहे. नद्या, तलाव, भातशेतीच्या प्रदेशात; तसेच दलदली भागात राहण्यास त्यांना पसंत असते. काळ्या शराटी आणि इतर पक्षी रसायनी परिसरात दिसत आहे, असे पक्षी प्रेमी विनायक डुकरे यांनी सांगितले.