
चावणे बंधाऱ्यावरून प्रवास धोकादायक
रसायनी, ता. १२ (बातमीदार) ः रसायनीतील चावणे पंचक्रोशीतील नागरिकांना पाताळगंगा नदीपलिकडे आपटे, गुळसुंदे ग्रामपंचायतीतील गावांत जाण्यासाठी पुलाची सुविधा नाही. त्यामुळे नागरिकांना पावसाळा संपल्यानंतर जीव धोक्यात घालून चावणे प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा नळ योजनाच्या बंद, जुन्या बंधाऱ्यावरून पायी, दुचाकीवरून प्रवास करावा लागतो. बंधारा अनेक ठिकाणी खचल्याने यावरून प्रवास धोकादायक बनला आहे.
बंधाऱ्यावरून जाताना अंदाज आला नाही, तर पाण्यात पडून दुर्घटना होऊ शकते, अशी भीती परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. चावणे पंचक्रोशीतील जांभिवली, सवणे, कालिवली, चावणे या चार गावांमधील व हद्दीतील चार आदिवासी वाड्यांतील लोक आपटे, गुळसुंदे याकडे जाताना नदीवरील एमआयडीसीच्या पुलावरून वळसा घालून जावे लागते. त्यासाठी सात-आठ किमी अंतर जास्त मोजावे लागते शिवाय नाहक वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे नागरिक पावसाळ्याव्यतिरिक्त जवळच्या अंतरासाठी चावणे बंधाऱ्यावरून प्रवास करतात.
चार-पाच फूट रुंदीच्या बंधाऱ्याचे काम जीर्ण झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे धुप होऊन काही ठिकाणी बांधकाम खचल्याने बंधारा धोकादायक बनला आहे.
बंधाऱ्यावरून जाताना रस्ता, पाण्याचा अंदाज न आल्याने पाताळगंगा नदीत पडल्याच्या घटनाही याआधी घडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर खासगी संस्था बंधाऱ्याचे दुरुस्तीचे काम करतात. मात्र गेल्या दोन तीन वर्षापासून दुरुस्तीचे काम झाले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बंधाऱ्याची लवकरात लवकरच दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सारसईतील आठ वाड्यांतील नागरिकांना नदीपलीकडे आपटे, गुळसुंदेकडे जाण्यासाठी पूल नाही. त्यामुळे अनेक नागरिक पायी जाताना रेल्वेच्या पुलाचा वापर करतात. जाताना रेल्वे पुलावर अपघाताच्या घटना घडल्या असून काहींचा जीव गमवावा लागला आहे. चावणे आणि आपटे ग्रामपंचायतीच्या क्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी नदीवर पूल बांधला पाहिजे.
- अंजू पवार, सामाजिक कार्यकर्त्या, सारसई
पावसाळा संपला की बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येते. मात्र दोन-तीन वर्षांपासून काम झालेले नाही. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे धूप होऊन, काही ठिकाणी बांधकाम ढासळल्याने बंधारा धोकादायक झाला आहे. नदीच्या पलीकडे जाताना नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन, नदीवर पूल बांधणे गरजेचे आहे.
रमेश पाटील, ग्रामस्थ, चावणे