
प्रकल्पग्रस्तांचे उपोषण स्थगित
रसायनी, ता. ८ (बातमीदार) : अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनीत चावणे व जांभिवली गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या मुलांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाव्यात, अशी मागणी मनकोबा प्रकल्पग्रस्त शेतकरी सेवाभावी संस्था, चावणे यांनी केली आहे. या मागणीसाठी बुधवार कंपनी प्रवेशद्वारासमोर उपोषण करण्यात येणार होते. मात्र आमदार महेश बालदी यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
कंपनीचा नवीन प्रकल्प चावणे आणि जांभिवली गावात एमआयडीसीने संपादित केलेल्या सुमारे ३६ एकर जागेत सुरू होत आहे. कंपनी व्यवस्थापनाकडे प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाव्यात आणि इतर मागण्याचा सातत्याने पाठपुरावा केला आहे, मात्र दखल घेतली न गेल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आठ मार्चपासून उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान आमदार महेश बालदी यांच्या मध्यस्थीने सध्या उपोषण स्थगित करण्यात आले आहे.